मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 ऑगस्ट 2025
मुंबई, – कालिना विधानसभा मतदार नोंदणी कार्यालयात प्रवेश करुन चोरी करुन पळून गेलेल्या एका दुकलीस दोन महिन्यानंतर अटक करण्यात वाकोला पोलिसांना यश आले आहे. तुषार मोरे आणि रोहित कागदा अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या दोघांनी कार्यालयातील रॅक पत्र, बार, सिलिंग फॅन आणि स्ट्रिल नळाची चोरी केली होती, नळ चोरीस गेल्याने संपूर्ण कार्यालय जलमय झाले होते. या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असून त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
युवराज गोरख गढरी हे ठाण्यातील रहिवाशी आहे. सध्या ते सांताक्रुज येथील कालिना विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. जून 2025 पासून ते तिथेच प्रभारी नायब तहसिलदार म्हणून काम करतात. त्यांचे कार्यालय वाकोला, आराम सोसायटी, बीएमसी मंडई इमारत येथे असून तळमजल्यावर कार्यालय तर पहिल्या मजल्यावर हॉल आहे. त्याच्या बाजूला शासनाकडून आधार केंद्र चालविण्यासाठी जागा देण्यात आली आहे. त्यांच्या कामाच्या सुविधेसाठी शासनाकडून त्यांना लोखंडी रॅक कालिना कर्यालयास प्राप्त झाले होते. त्यापैकी रॅकचे 100 हून अधिक पत्रे, 25 बार उपयोगातत नव्हते. त्यामुळे ते साहित्य कार्यालयातील एका बाजूला ठेवण्यात आले होते.
6 जून ते 9 जून या कालावधीत कार्यालयाला सुट्टी असल्याने अज्ञात चोरट्याने त्यांच्या कार्यालयातल हॉलच्या खिडकीतून आत प्रवेश केला होता. या चोरट्याने 70 रॅकचे पत्रे, 25 रॅकचे बार, सीपी कंपनीचे पाच सीसीटिव्ही कॅमेरा, डिव्हीआर, सिलिंग फॅन, तीन स्टिल नळ आदी सुमारे 54 हजाराचा मुद्देमाल चोरी केला होता. चोरट्यांनी नळ चोरी केल्याने संपूर्ण कार्यालयात पाणी भरले होते. 9 जूला सकाळी दहा वाजता हा प्रकार उघडकीस येताच युवराज गढरी यांनी वाकोला पोलिसांना ही माहिती सांगितली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळीचा पंचनामा केल्यानंतर युवराज गढरी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. या फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी दोन महिन्यांपासून फरार असलेल्या तुषार मोरे आणि रोहित कागदा या दोघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच ही चोरी केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर या दोघांनाही रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, त्यांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.