मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 एप्रिल 2025
मुंबई, – पार्किंगवरुन झालेल्या वादातून एका 30 वर्षांच्या फॅशन डिझायनर महिलेचा विनयभंग करुन तिला तिघांनी मारहाण केल्याची घटना सांताक्रुज परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध मारहाणीसह विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
तक्रारदार महिला विवाहीत असून ती तिच्या पतीसोबत सांताक्रुजच्या वाकोला परिसरातील एका निवासी सोसायटीमध्ये राहते. ही महिला फॅशन डिझायनर असून तिचा पती भारतीय फुटबॉय संघातील खेळाडू आहे. मंगळवारी तिला तिच्या पतीसोबत बाहेर जायचे होते. त्यामुळे तिला तिची कार पार्किंगमधून बाहेर काढायची होती, मात्र तिथे दुसर्या रहिवाशाने त्याची कार पार्क केली होती. त्यामुळे तिला तिची कार बाहेर काढता येत नव्हती. त्यामुळे तिने सुरक्षारक्षकाला बोलावून संबंधित रहिवाशाचा मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून त्याची कार बाजूला काढण्याची विनंती केली होती.
वारंवार विनंती करुनही त्याने त्याची कार काढली नाही. त्यामुळे ती त्याच्या घरी गेली होती. यावेळी आरोपीसह त्याच्या दोन्ही मुलांनी तिला मारहाण करुन तिचा विनयभंग केला होता. तिला धक्काबुक्की, केसांना धरुन बाहेर काढले तसेच तिच्याशी गैरवर्तन केले होते. तिच्या पतीलाही या तिघांनी शिवीगाळ करुन धमकी दिली होती. या घटनेनंतर तिने वाकोला पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.
तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिन्ही आरेापीविरुद्ध मारहाणीसह विनयभंग आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून तिन्ही आरोपींची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होईल असे पोलिसाकडून सांगण्यात आले.