हेलिकॉप्टर चालवतो का असे विचारले म्हणून 41 वर्षांच्या व्यक्तीची हत्या

हत्येच्या गुन्ह्यांत 20 वर्षांच्या तरुणाला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 मार्च 2025
मुंबई, – भरवेगात जाणार्‍या स्कूटीचालकास हेलिकॉप्टर चालवतो का असे विचारले म्हणून रागाच्या भरात सिमेंट ब्लॉक डोक्यात मारहाण करुन ओमप्रकाश मालहू शर्मा नावाच्या एका 41 वर्षांच्या व्यक्तीची आरोपी स्कूटचालकाने हत्या केल्याची घटना सांताक्रुज परिसरात घडली. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपी स्कूटीचालक अहमद एहसान अन्सारी याला वाकोला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना रविवारी पहाटे साडेचार वाजता सांताक्रुज येथील वाकोला, चिमनलाल स्कूलसमोर घडली. रामप्रकाश मालहू शर्मा हा सांताक्रुज येथील गोळीबार, पाचवा रोडवर राहत असून कारपेंटर आहे. मृत ओमप्रकाश हा त्याचा मोठा भाऊ आहे. रविवारी पहाटे ओमप्रकाश हा त्याचा मित्र राजमंगल गुप्ता याच्यासोबत घराच्या दिशेने जात होता. यावेळी अहमद हा स्कूटीवरुन भरवेगात जात होता. चिमनलाल स्कूलसमोर आल्यानंतर त्याने अचानक स्कूटीला जोरात ब्रेक लावला होता. यावेळी ओमप्रकाश अहमदला हेलिकॉप्टर चालवतो का अशी विचारणा केली होती. त्यावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती.

रागाच्या भरात त्याने ओमप्रकाशच्या डोक्यात तिथे असलेल्या सिमेंटच्या ब्लॉकने हल्ला केला होता. त्यात ओमप्रकाश हा गंभीर जखमी झाला होता, त्यामुळे त्याला तातडीने व्ही. एन देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता, मात्र ओमप्रकाशच्या मृत्यूनंतर आता पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत पळून गेलेल्या अहमद अन्सारी या पोलिसांनी अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. ओमप्रकाशच्या मृत्यूचे वृत्त समजताच त्याच्या साईनाथ चाळ कमिटीच्या रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page