पैशांवरुन झालेल्या वादातून 26 वर्षांच्या तरुणाची हत्या

सात दिवसांनी हत्येचा गुन्हा दाखल होताच आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 फेब्रुवारी 2026
मुंबई, – पैशांवरुन झालेल्या वादातून रणजीत दिनानाथ चौधरी या 26 वर्षांच्या तरुणाची त्याच्याच मित्राने बोथट हत्याराने वार करुन हत्या केल्याची घटना सांताक्रुज येथील वाकोला परिसरात उघडकीस आली आहे. सात दिवसांत हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी मित्राला वाकोला पोलिसांनी अटक केली आहे. विक्की राजकुमार चौधरी असे या 27 वर्षांच्या आरोपीचे नाव असून हत्येच्या याच गुन्ह्यांत त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. विक्कीने रणजीतची हत्या केल्यानंतर त्याला घरात कोंडून बाहेरुन लॉक लावून पलायन केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

ही घटना गुरुवार 5 फेब्रुवारीला सायंकाळी सात वाजता सांताक्रुज येथील गावदेवी दत्त मंदिर रोड, राजीवनगर, जय भवानी चाळीत घडली. दिनानाथ सुक्खू चौधरी हे मूळचे उत्तरप्रदेशच्या गोरखपूरचे रहिवाशी आहे. सध्या ते कालिमाता मंदिराजवळील बढया चौक परिसरात राहत असून ते व्यवसायाने पेंटर आहेत. रणजीत हा त्यांचा 26 वर्षांचा मुलगा असून विक्की हा त्याचा मित्र आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये रुमच्या पैशांवरुन वाद सुरु होता. पैशांवरुन केवळ आश्वासन मिळत असल्याने शत्रुत्व निर्माण झाले होते.

गुरुवारी सायंकाळी सात वाजता रणजीत हा गावदेवी दत्त मंदिर रोड, जय भवानी चाळीतील त्याच्या राहत्या घरी होता. यावेळी तिथे विक्की आला आणि त्यांच्यात पैशांवरुन पुन्हा वाद झाला होता. या वादानंतर त्याने रणजीतवर बोथट हत्याराने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्याच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर विकी त्याला घरात कोंडून बाहेरुन लॉक लावून पळून गेला होता. हा प्रकार नंतर स्थानिक रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या रणजीतला जवळच्या व्ही. एन देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्यात त्याच्या शरीरावर बोथट हत्याराने वार केल्याच्या जखमा दिसून आल्या होत्या. त्याची हत्या झाल्याचा अहवाल डॉक्टरांकडून देण्यात आला. या घटनेची माहिती हॉस्पिटलमधून समजताच वाकोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

याप्रकरणी दिनानाथ चौधरी यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यांच्या जबानीनंतर पोलिसांनी विक्की चौधरी याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या विक्कीला बुधवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page