घरफोडीच्या गुन्ह्यांत पोलीस कोठडी असलेल्या आरोपीचे पलायन

पोलीस अंमलदार कक्षेच्या टॉयलेटची खिडकीची जाळी तोडून पलायन

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ जुलै २०२४
मुंबई, – घरफोडीच्या गुन्ह्यांत पोलीस कोठडीत असलेल्या एका आरोपीने मंगळवारी वाकोला पोलीस ठाण्यातून पलायन केल्याची घटना घडली. महेश दिलीप गुरव असे या आरोपीचे नाव आहे. पोलीस अंमलदार कक्षेच्या टॉयलेटची खिडकीची जाळी तोडून त्याने पलायन केल्याने तिथे उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी महेशविरुद्ध कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याचा स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारीही शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पॅरेलाल पेबारु राजभर हे सांताक्रुज येथील वाकोला, आदर्शनगरच्या अशोक चाळ कमिटीमध्ये राहतात. याच परिसरात त्यांचे एक सलूनचे दुकान आहे. सोमवारी १५ जुलैला त्यांची पत्नी आणि मुलगा गावी जाणार होते, त्यामुळे ते त्यांच्या पत्नी आणि मुलाला सोडण्यासाठी कुर्ला टर्मिनस येथे गेले होते. रात्री दोन वाजता ते त्यांच्या मुलीसोबत घरी आले होते. यावेळी त्यांना रुमचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. यावेळी आतून महेश गुरव याने दरवाजा उघडला. काही कळण्यापूर्वीच त्याने त्याच्याकडील रॉडने त्यांच्या डोक्याला, तोंडाला आणि छातीवर हल्ला केला. यावेळी त्यांची मुलगी घाबरली आणि तिने मदतीसाठी जोरात आरडाओरड सुरु केली. त्यामुळे स्थानिक रहिवाशी तिथे जमा झाले आणि त्यांनी पळून जाणार्‍या महेश गुरवला ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान महेश हा रुममध्ये कोणीही नसल्याची संधी साधून चोरीच्या उद्देशाने तिथे आला होता. त्याने पॅरेलाल राजभर यांच्या कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरी केले होते. तो पळून जाण्याच्या तयारीत असताना तिथे पॅरेलाल राजभर हे त्यांच्या मुलीसोबत आले होते. त्यामुळ त्याचा चोरीचा प्रयत्न फसला गेला होता. त्याला पकडल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी वाकोला पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर घटनास्थळी गेलेल्या वाकोला पोलिसांनी चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या महेश गुरव याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

याप्रकरणी पॅरेलाल राजभर यांच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी महेशविरुद्ध ३३१ (७) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता तो पोलीस अंमलदार कक्षाच्या टॉयलेटमध्ये गेला होता. यावेळी त्याने टॉयलेटची खिडकीची जाळी तोडून तेथून पलायन केले होते. हा प्रकार नंतर तिथे उपस्थित पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. तो पळून गेल्याची खात्री होताच त्याच्याविरुद्ध पोलीस हवालदार सुनिल लक्ष्मण म्हस्के यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी २६२ भारतीय न्याय सहिता अन्वये गुन्हा दाखल केला होता. पोलीस ठाण्यातून आरोपीने पलायन केल्याच्या घटनेने वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वाकोला पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला त्याच्या अटकेचे आदेश दिले आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. महेश गुरव हा शीव-कोळीवाडा, नूर मशिदीजवळील म्हाडा ट्रॉन्झिंट कॅम्पमध्ये राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page