वर्क फ्रार्म होमच्या नावाने गंडा घालणार्‍या टोळीचा पर्दाफाश

राजस्थानचे रहिवाशी असलेल्या पाच आरोपींना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
27 एप्रिल 2025
मुंबई, – वर्क फ्रॉम होमसह अन्य ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील एका राजस्थानी टोळीचा वाकोला पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून या टोळीच्या अटकेनंतर मुंबईसह पुणे आणि छत्तीसगढ येथील सायबर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पाचहून अधिक ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या पाचही गुन्ह्यांत आतापर्यंत तीस कोटीची फसवणुक झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. राजकरणसिंग प्रकाशसिंग तंवर, करणसिंग रामनरेश सिंग, मोहम्मद शाकीब असफाक अन्सारी, मिराज अन्सारी मोहम्मद आक्रम आणि फुजेल अहमद जमिल अहमद अन्सारी अशी या पाचजणांची नावे असून ते सर्वजण राजस्थानचे रहिवाशी आहेत.

सांताक्रुज परिसरात तक्रारदार इंजिनिअर त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत असून ते एका खाजगी कंपनीत कामाला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांची अज्ञात सायबर ठगांनी वर्क फ्रॉर्म होमच्या नावाने 3 लाख 41 हजाराची फसवणुक केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर वाकोला पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा वाकोला पोलीस ठाण्यातील सायबर सेलचे अधिकारी तपास करत होते. ज्या बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा झाली होती, ती रक्कम राजस्थानातील काही बँक खात्यात जमा झाली होती. या गुन्ह्यांतील आरोपी राजस्थानात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीनंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त मनिष कलवानिया, सहाय्यक पोलीस आयुक्त दौलत साळवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे प्रमुख पोलीस निरीक्षक अमर पाटील, पोलीस उपनिरीक्षक यशपाल बडगुजर, जीवन गुट्टे, पोलीस शिपाई संदीप अमूप, महिला शिपाई रुपाली सावंत आदीचे एक पथक राजस्थानात पाठविण्यात आले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने विविध परिसरातून राजकरणसिंग तंवर, करणसिंग सिंग, मोहम्मद शाकीब अन्सारी, मिराज अन्सारी आणि फुजेल अहमद अन्सारी या पाचजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या पाचही आरोपींना अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर त्यांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना सोमवार 28 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत या आरोपींनी इतर पाच ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. फसवणुकीसाठी या आरोपींनी सायबर ठगांना विविध बँकेत खाती उघडून दिले होते.

या बँक खात्यात फसवणुकीची ही रक्कम जमा झाली होती. पूर्व सायबर सेलमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांत 7 कोटी 27 लाख, पश्चिम सायबर सेलमध्ये 40 लाख 85 हजार, उत्तर सायबर सेलमध्ये 13 लाख 84 हजार, पिंपरी चिंचवड सायबर सेलमधये 22 लाख 85 हजार आणि छत्तीसगढ सायबर सेलमध्ये 48 लाखांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला आहे. या टोळीने उघडलेल्या बँक खात्यात भारतातील विविध राज्यातील सायबर फसवणुकीची सुमारे तीस कोटीची रक्कम जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page