साडी वाटप सुरु असल्याची बतावणी करुन सोनसाखळी चोरी

पळून गेलेल्या सराईत आरोपीस अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 फेब्रुवारी 2026
मुंबई, – मालक मोफत साडीचे वाटप करत असल्याची बतावणी करुन एका वयोवृद्ध महिलेची सोनसाखळी चोरी करुन पळून गेलेल्या एका सराईत आरोपीस वाकोला पोलिसांनी अटक केली. फरमान तन्वीर पठाण असे या आरोपीचे नाव असून त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

69 वर्षांची वयोवृद्ध तक्रारदार महिला ही सांताक्रुज येथे राहते. 22 जानेवारी 2026 रोजी ती घरातील सामान आणण्यासाठी दुकानात आली होती. यावेळी तिच्याकडे एक तरुण आला आणि त्याने त्याचे मालक गरीबांना साडीचे वाटप करत आहे. तुम्हीही साडी घ्या असे सांगून तिला गळ्यातील सोनसाखळी काढण्यास सांगितले होते. फ्रीमध्ये साडी मिळत असल्याने तिने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. काही अंतर गेल्यानंतर त्याने तिला तिची सोनसाखळी एका रुमालात ठेवण्यास सांगितले. त्यामुळे तिने तिची सोनसाखळी रुमालात ठेवली होती.

बराच अंतर चालल्यानंतर तिला कुठेही साडीचे वाटप असल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे तिने त्या व्यक्तीला मागे वळून पाहिले असता तो तिथे नव्हता. त्याने हातचलाखीने तिची सोनसासाखळी चोरी करुन तेथून पलायन केले होते. हा प्रकार नंतर लक्षात येताच तिने वाकोला पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी पळून गेलेल फरमान पठाण याला ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्याने तोययागिरी करुन हातचलाखीने तक्रारदार वयोवृद्ध महिलेची सोनसाखळी चोरी करुन पलायन केल्याची कबुली दिली. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. फरमान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या अटकेने अशाच काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page