रोटरी क्लबच्या सभासदांच्या सहलीच्या 33 लाखांचा अपहार
मध्यप्रदेशच्या हॉलिडे प्लॅनरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 फेब्रुवारी 2026
मुंबई, – आसाम आणि मेघालय सहलीसाठी रोटरी क्लबच्या 60 सभासदांकडून घेतलेल्या प्रत्येकी 55 हजाराप्रमाणे सुमारे 33 लाख रुपयांचा अपहार करुन फसवणुक झाल्याचा प्रकार सांताक्रुज परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मध्यप्रदेशचा रहिवाशी असलेला हॉलिडे प्लॅनर राहुल जैन याच्याविरुद्ध वाकोला पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून तपासकामी पोलिसांची एक टिम मध्यप्रदेशात जाणार आहे.
61 वर्षांचे शिवशंकर रामआसरे अग्रवाल यांचा कंन्ट्रक्शनचा व्यवसाय असून ते विलेपार्ले परिसरात राहतात. ते रोटरी क्लबचे सभासद असून या क्लबमार्फत अनेकदा त्यांच्या सभासदांसाठी सहलीचे आयोजन केले जाते. मार्च 2025 रोजी रोटरी क्लबच्या सभासदांना जार्जिया येथे जायचे होते. त्यामुळे त्यांचे परिचित मित्र मोती मनी सिंग यांनी राहुल जैन याच्याशी संपर्क साधला होता. राहुल हा हॉलिडे प्लॅनर असून त्याच्यासोबत रोटरी क्लबचे 55 हून अधिक सभासद जार्जिया येथे गेले होते. हा अनुभव चांगला असल्याने त्यांनी पुढील सहलीसाठी राहुल जैन याची निवड करण्याचा निर्णय घेतला होता.
गेल्या वर्षी या सभासदांनी आसाम, मेघालयच्या सहलीचे आयोजन केले होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा राहुल जैनशी संपर्क साधला होता. त्यानंतर त्यांची सांताक्रुज येथील प्रभात कॉलनीतील एका हॉटेलमघ्ये मिटींग झाली होती. तिथे राहुलसोबत क्लबचे इतर काही सभासद उपस्थित होते. यावेळी राहुलने त्यांना संपूर्ण सहलीची माहिती सांगून प्रत्येक सभासदामागे 75 हजार रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले होते. त्यास सर्वच सभासदांनी होकार दिला होता. ठरल्याप्रमाणे 9 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2025 या कालावधीत सहलीचे नियोजन करण्यात आले होते. त्यांच्यात तीन टप्प्यात सहलीचे पैसे देण्याचे ठरे होते. त्यामुळे 22 जुलैपासून पहिला टप्पा तर 20 सप्टेंबरला दुसरा टप्यातील पैसे जमा करण्यास सर्व सभासदांनी करण्यास सुरुवात केले होते.
अशा प्रकारे प्रत्येक सभासदांनी दोन टप्यातील प्रत्येकी 55 हजार रुपये राहुल जैन याच्याकडे जमा केले होते. 30 ऑक्टोंबरला राहुलने सर्वच सभासदांना आसाम आणि मेघालय येथे प्रचंड पाऊस सुरु असून त्यांची सहली कॅन्सल करायची की सहलीचे नियोजन पुढे करायचे याबाबत विचारणा केली होती. यावेळी सर्वांनी सहल कॅन्सल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राहुलने 9 नोव्हेंबरपर्यंत सर्वांचे पैसे परत करण्याचे आश्वाासन दिले होते. 8 नोव्हेंबरला राहुल मुंबईत आला आणि दुसर्या दिवशी तो काही सभासदांना सांताक्रुज येथील एका हॉटेलमध्ये भेटला होता. यावेळी त्याने सर्व सभासदांना धनादेश दिले होते. मात्र त्याने धनादेश बँकेत टाकण्यास मनाई केली होती. त्यामुळे या सभादांनी धनादेश बँकेत टाकले नव्हते.
एक महिना उलटूनही राहुलचा कॉल आला नाही. त्यामुळे 19 डिसेंबरला शिवशंकर अग्रवाल यांच्यासह इतर सभासदांनी राहुलला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मोबाईल बंद येत होता. त्याचा संपर्क होत नव्हता. अखेर या सभासदांनी त्याने दिलेला धनादेश बँकेत टाकला होता. मात्र पुरेशी रक्कम नसल्याने सर्व धनादेश बाऊंस झाले होते. मेघालय आणि आसाम सहलीचे आयोजन करुन राहुलने रोटरी क्लबच्या 55 सभासदांकडून प्रत्येकही 60 हजाराप्रमाणे सुमारे 33 लाख रुपये घेतले होते. मात्र सहल कॅन्सल झाल्यानंतर सभासदांकडून घेतलेली रक्कम परत न करता पलायन केले होते.
हा प्रकार लक्षात येताच शिवशंकर अग्रवाल यांच्यासह इतर सभासदांनी वाकोला पोलिसांना घडलेला प्रकार सांगून राहुल जैनविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. राहुल हा मध्यप्रदेशच्या सटनाचा रहिवाशी असल्याने त्याच्या अटकेसाठी एक टिम लवकरच मध्यप्रदेशात जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.