मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 एप्रिल 2025
मुंबई, – मद्यप्राशन करुन भरवेगात जाणार्या एका कारने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. जखमींमध्ये मृत महिलेच्या दोन मुलीसह रिक्षाचालकाचा समावेश आहे. हाजरा इस्माईल शेख असे या 48 वर्षांच्या मृत महिलेचा तर जखमीमध्ये तिचे दोन्ही मुली शाहीन इस्माईल शेख (20), शिरीन इस्माईल शेख (17) आणि रिक्षाचालक सोनू यादव यांचा समावेश आहे. या तिघांना प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले. याप्रकरणी अपघाताची नोंद करुन वनराई पोलिसांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचा (सीआयएसएफ) अधिकारी धोंडूराम यादव याला अटक केली. कार चालविताना धोंडूरामने मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्याच्यावर लवकरच निलंबनाची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हाजरा ही तिच्या पती आणि चार मुलांसोबत अंधेरी परिसरात राहते. बुधवारी ती तिच्या कुटुंबियांसोबत ईदनिमित्त तिच्या नातेवाईकाकडे गेली होती. रात्री उशिरा जेवण केल्यानंतर ते सर्वजण त्यांच्या घरी जाण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांनी दोन रिक्षा बुक केल्या होत्या. एका रिक्षात हाजरा ही तिचे दोन मुली शाहीन आणि शिरीन यांच्यासोबत तर तिचे पती अन्य एका मुलीसोबत दुसर्या रिक्षाने प्रवास करत होते. ही रिक्षा गोरेगाव येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ येताच एका भरवेगात जाणार्या कारने त्यांच्या रिक्षाला जोरात धडक दिली. त्यानंतर कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने दुभाजकावर कार आदळली.
या अपघातात रिक्षाचालकासह तिन्ही प्रवाशी जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच वनराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या चौघांना तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे हाजराला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर रिक्षाचालक सोनू यादव, तिचे दोन मुली शाहीन आणि शिरीन यांना प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले. याप्रकरणी इस्माईल शेख यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यांच्या जबानीनंतर पोलिसांनी कारचालक धोंडूराम यादव याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने कार चालवून एका महिलेच्या मृत्यूस तर इतर तिघांना दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
तपासात धोंडूराम हा सीआयएसएफमध्ये अधिकारी पदावर काम करतो. कार चालविताना त्याने मद्यप्राशन केले होते. त्याच्या मेडीकलमध्ये त्याने मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह कलमे लावण्यात आली होती. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी सांगितले.