तरुणाला चाकूने भोसकून बाईक चोरी करुन तिघांचे पलायन
हत्येचा प्रयत्नासह रॉबरीच्या गुन्ह्यांत तिन्ही आरोपींना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 नोव्हेंबर 2025
मुंबई, – क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादानंतर एका 22 वर्षांच्या तरुणाच्या पोटात चाकूने भोसकून त्याची बाईक घेऊन तीन आरोपींनी पलायन केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हल्ल्यात जखमी झालेल्या जोयेब नईम बेग या तरुणावर शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकणी हत्येचा प्रयत्नासह रॉबरीचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या तिन्ही आरोपींना वनराई पोलिसांनी अटक केली आहे. नईम शहाबुद्दीन धोबी, समीर शहाबुद्दीन धोबी आणि विनोदकुमार वडिवेल पडियाची अशी या तिघांची नावे आहेत. याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसात ते रात्री आठ वाजता गोरेगाव येथील आरे सिग्नलब्रिजखाली घडली. जोयेब हा त्याच्या बाईकवरुन घराच्या दिशेने होता. ही बाईक आरे सिग्नल ब्रिजखाली थांबली असता तिथे अचानक तीन तरुण आले होते. काहीही कारण नसताना त्यांनी त्याच्याशी वाद घालून बाईकची चावी काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी जोयेबने त्यांना प्रतिकार केला असता त्यातील एकाने त्याच्याकडील तिक्ष्ण हत्याराने त्याच्या पोटात भोसकले होते. या हल्ल्यात जोयेब हा गंभीर जखमी झाला होता. तिथे कोसळल्यानंतर ते तिघेही त्याची बाईक चोरी करुन पळून गेले होते. ही माहिती मिळताच वनराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
जखमी झालेल्या जोयेबला पोलिसांनी तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी वनराई पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना नईम शहाबुद्दीन धोबी, समीर शहाबुद्दीन धोबी आणि विनोदकुमार वडिवेल पडियाची या तिन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून चोरीची बाईकसह गुन्ह्यांतील चाकू पोलिसांनी हस्तगत केला आहे. हल्ला करण्यापूर्वी जोयेब आणि तिन्ही आरोपीमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता.
या वादानंतर जोयेब तेथून निघून गेला होता. या वादानंतर त्यांनी त्याला धडा शिकवण्यासाठी त्याच्यावर आरे सिग्नल ब्रिजजवळ प्राणघातक हल्ला करुन त्याची बाईक चोरी करुन पलायन केले होते. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, त्यांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त महेश चिमटे, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय भिसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने, पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र पोस्टुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कदम, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजीत भिसे, रणजीत वणवे, बापूराव हराळ, महिला पोलीस उपनिरीक्षक रुक्मिणी माने, तेजल आहेर, पोलीस हवालदार राणे, धनू, पोलीस शिपाई येवले, नवलू यांनी केली.