मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ जानेवारी २०२५
मुंबई, – राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकार्याची अज्ञात सायबर ठगाने ऑनलाईन फसवणुक केल्याचा प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. क्रेडिट कार्डची ऑफर देऊन या ठगाने त्यांच्या दोन्ही बँक खात्याची माहिती मिळवून सुमारे चार लाखांचा अपहार केला होता. याप्रकरणी वनराई पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून या सायबर ठगांचा शोध सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा सायबर सेलचे अधिकारीही संमातर तपास करत आहेत.
मिथुन जयपाल जाधव हे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत गोरेगाव येथील एसआरपीएफ कॅम्प परिसरात राहतात. सध्या ते राज्य राखीव पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. २१ डिसेंबरला ते रजेवर असल्याने घरी होते. दुपारी एक वाजता त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. त्याने त्यांना क्रेडिट कार्डबाबत विचारणा केली होती. त्यावर त्यांनी होकार दिला होता. काही वेळानंतर या व्यक्तीने त्यांना बँकेची एक लिंक पाठविली होती. ही लिंक ओपन करुन त्यांनी एक ऍप डाऊनलोड केला होता. पेज ओपन झाल्यानंतर त्यांनी त्यांची माहितीसह ओटीपी क्रमांक शेअर केला होता. ही माहिती अपलोड करताना त्यांच्या डेबीट कार्डवरुन तीन रुपये डेबीट झाले होते. त्यानंतर त्यांच्या खात्यात इतर काही ऑनलाईन व्यवहार झाले होते.
या व्यवहारातून त्यांच्या दोन्ही बँकेत खात्यातून ४ लाख आठ हजार रुपये डेबीट झाले होते. पैसे डेबीट झाल्याचा मॅसेज बँकेतून प्राप्त होताच त्यांना फसवणुकीचा हा प्रकार समजला. त्यानंतर त्यांनी ऑनलाईन सायबर हेल्पलाईनसह वनराई पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह सायबर सेल पोलिसाकडून तपास सुरु आहे.