महिलेची हत्या करुन पुरावा नष्ट करणार्या प्रियकराला अटक
सतत संशय घेत असल्याने हत्या केल्याची आरोपीची कबुली
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३१ मे २०२४
मुंबई, – गेल्या एक वर्षांपासून लिव्ह ऍण्ड रिलेशनशीपमध्ये राहत असलेल्या दिव्या टोपो या महिलेची हत्येनंतर हत्येचा पुरावा नष्ट करुन पळून गेलेल्या प्रियकराला हरियाणा येथून गजाआड करण्यात वनराई पोलिसांना यश आले आहे. जयराम लकाडा असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सतत संशय घेऊन वाद घालत असल्याने रागाच्या भरात जयरामने दिव्याची हत्या केल्याची कबुली दिली होती, हत्येनंतर तो मैत्रिणीच्या घरी लपला होता.
गोरेगाव येथील अशोकनगरात जयराम हा दिव्यासोबत भाड्याच्या रुममध्ये राहत होता. ते दोघेही मूळचे ओरिसाच्या सुंदरगढ, सुरुलता सुंजोरे गावचे रहिवाशी होते. एक वर्षांपूर्वी नोकरीसाठी ते दोघेही मुंबईत आले होते. तेव्हापासून ते गोरेगावच्या नेसको परिसरात मजुरीचे काम करत होते. राहण्याची व्यवस्था नसल्याने जयरामने २० हजार रुपयांचे डिपॉझिट आणि पाच हजार रुपयांच्या भाड्यावर अशोकनगरात एक रुम घेतला होता. तळमजल्यावर रबर मोल्डिंगचा कारखाना होता तर पोटमाळ्यावर ते दोघेही राहत होते. गेल्या आठवड्यात दिव्याचा मृतदेह तिच्या राहत्या घरी वनराई पोलिसांना सापडला होता. या हत्येनंतर जयराम हा पळून गेला होता. तिची हत्या करुन त्याने या हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी जयरामविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन तो हरियाणा येथे पळून गेल्याचे उघडकीस आले होते. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामप्यारे राजभर यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई पोलिसांचे एक विशेष पथक हरियाणा येथे गेले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने मैत्रिणीच्या घरी वास्तव्यास असलेल्या जयरामला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने दिव्याची हत्या केल्याची कबुली दिली. ते दोघेही एकाच गावचे रहिवाशी असून त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यामुळे ते एक वर्षांपूर्वी गावाहून मुंबईत पळून आले होते. गोरेगाव येथे ते दोघेही पती-पत्नीमध्ये राहत होते. मात्र दिव्या त्याच्यावर सतत संशय घेत होती. त्याचे इतर महिलांसोबत संबंध असल्याचा आरोप करुन त्याच्याशी वाद घालत होती. सतत होणार्या वादाला कंटाळून त्याने दिव्याची तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली होती. तिच्या मृतदेहाची त्याला मृतदेहाची विल्हेवाट लावायची होती, मात्र मृतदेह जड असल्याने त्याला ते शक्य झाले नाही. त्यामुळे त्याने तिचा मृतदेह प्लास्टिक पिशवीत गुंडाळून घरातील लाईट, पंखे आणि कुलर चालू करुन पलायन केले होते. मात्र पळून गेलेल्या जयरामला तीन दिवसांनी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत शुक्रवारी दुपारी बोरिवली कोर्टात हजर केल्यानंतर त्याला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.