बारच्या सहकारी मित्राच्या हत्येप्रकरणी आरोपीस अटक

मालकाला भडकावतो म्हणून हत्या केल्याची कबुली

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 फेब्रुवारी 2025
मुंबई, – बारमध्ये काम करणार्‍या सहकारी मित्राची हत्या करुन पळून गेलेल्या आरोपी कर्मचार्‍याला 48 तासांत वनराई पोलिसांनी माहीम येथून अटक केली. देवराज विरभद्र गौडा असे या आरोपी कर्मचार्‍याचे नाव असून त्याच्यावर त्याचा सहकारी कर्मचारी रघु ऊर्फ अरुण गौडा याची हत्या केल्याचा आरोप आहे. रघु हा देवराजविरोधात मालकाला सतत भडकावतो तसेच त्याच्यामुळेच एका ग्राहकाने त्याला मारहाण केल्याचा त्याला संशय होता, त्यातून रागाच्या भरात देवराजने रघुची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना मंगळवारी 25 फेब्रुवारीला पहाटे चार वाजता गोरेगाव येथील विश्वेश्वर नगर रोड, धडकन बार अ‍ॅण्ड रेस्ट्रॉरंटमध्ये घडली. याच बारमध्ये महेंद्र कर्णराम सेन हा त्याचे दोन सहकारी देवराज गौडा आणि रघु गौडा यांच्यासोबत काम करतो. सध्या ते बार बंद अवस्थेत असून तिथे काही कर्मचारी रात्रीच्या वेळेस झोपतात. गेल्या काही दिवसांपासून देवराज आणि रघु यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद होता. याच वादातून 25 फेब्रुवारीला झोपेत असलेल्या रघुची देवराजने तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. या हल्ल्याचा महेंद्र सेन हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता, मात्र महेंद्रला पाहताच तो तेथून पळून गेला होता. ही माहिती मिळताच वनराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

जखमी झालेल्या रघुला पोलिसांनी तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. तिथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर महेंद्र सेनच्या तक्रारीवरुन पोलिसांनी देवराजविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच देवराज पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी वनराई पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना तो माहीम येथे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांना मिळाली होती.

या माहितीनतर अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोली आयुक्त सिराज इनामदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र पोस्टुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण तुपारे, पोलीस उपनिरीक्षक राहुल देवडे, रंजीत वनवे, रावसाहेब वाघमोडे, व्यकंट तळेकर यांनी माहीम येथील रेतीबंदर परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून देवराजला ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्यानेच रघुची हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. तपासात रघु आणि देवराज यांच्यात काही दिवसांपासून क्षुल्लक कारणावरुन वाद होता. तो बारमालकाला त्याच्याविरुद्ध भडकावतो तसेच दोन दिवसांपूर्वी त्याला एका ग्राहकाने बेदम मारहाण केली होती. या सर्व घटनांना रघुच जबाबदार असल्याचा त्याचा संशय होता. त्यामुळे त्याला कायमचे संपविण्याच्या उद्देशाने त्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात रघुचा मृत्यू झाला. या हत्येनंतर तो माहीम येथे पळून गेला होता, मात्र गुन्हा दाखल होताच अवघ्या 48 तासांत त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page