मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ सप्टेंबर २०२४
मुंबई, – शेअर गुंतवणुकीच्या नावाने एका वयोवृद्धाची सुमारे पावणेदहा लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या आरोपीस वनराई पोलिसांनी अटक केली. रोशन राजेंद्र कुळे असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. फसवणुकीसाठी त्याने सायबर ठगांना बॅक खाती पुरविल्याचा आरोप आहे.
६६ वर्षांचे वयोवृद्ध गोरेगाव परिसरात राहत असून एका खाजगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. गेल्या वीस वर्षांत त्यांनी शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुक केली होती. जून महिन्यांत त्यांना व्हॉटअप ग्रुपमध्ये ऍड करण्यात आले होते. या ग्रुपमध्ये शेअरमार्केटसाठी मार्गदर्शन केले जात होते. कंपनीचे कार्यालय प्रभादेवी येथे असल्याचे त्यांना समजले होते. काही दिवसांनी त्यांना ग्रुपच्या ऍडमिनने शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देताना त्यांना एक सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले होते. त्यामुळे त्यांनी ते सॉफ्टवेअर मोबाईलवर डाऊनलोड केले होते. ग्रुपमध्ये शेअरची माहिती घेतल्यानंतर ऍडमीनच्या सांगण्यावरुन त्यांनी काही शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता.
२६ जून ते १५ जुलै २०२४ या कालावधीत विविध शेअरमध्ये नऊ लाख सत्तर हजाराची गुंतवणुक केली होती. त्यानंतर ऍडमिनने त्यांच्या नावाने २७ हजार ५०० शेअर अलोट झाले असून त्यांना ४१ लाख रुपये भरावे लागतील. ही रक्कम जमा केली नाहीतर त्यांचे खाते फ्रिज केले जाईल अशी धमकीवजा इशारा दिला होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच ते प्रभादेवी येथील कंपनीच्या कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांना संबंधित ग्रुपशी त्यांच्या कंपनीशी काहीही संबंध नसून त्यांची अज्ञात सायबर ठगांनी फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार करावी असा सल्ला दिला. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर हेल्पलाईन ऑनलाईन तर वनराई पोलीस ठाण्यात लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच तांत्रिक माहितीवरुन वॉण्टेड असलेल्या रोशन कुळे याला पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याच बँक खात्यात फसवणुकीची काही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. त्याने सायबर ठगांना फसवणुकीसाठी बँक खाते पुरविले होते. याकामी त्याला या ठगाकडून काही ठराविक रक्कमेचे कमिशन मिळाले होते. तपासात ही बाब उघडकीस आल्यानंतर त्याला पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यांत अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.