ड्रग्जचा ओव्हरडोस दोन कॉलेज तरुणांच्या जिवावर बेतला
गोरेगाव येथील नेस्को लाईव्ह कॉन्सर्टमधील घटनेने खळबळ
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
13 एप्रिल 2026
मुंबई, – शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या गोरेगाव येथील नेस्कोमधील संगीत कार्यक्रमाच्या लाईव्ह कॉर्न्स्टमध्ये मद्यप्राशननासह ड्रग्जचा ओव्हरडेास घेतल्यानंतर काही कॉलेज तरुणांची प्रकृती बिघडली. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला असून त्यात एका तरुणीचा समावेश आहे. याप्रकरणी लाईव्ह कॉर्न्स्टच्या आयोजकासह इतराविरुद्ध वनराई पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि एनडीपीएसच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत आयोजकासह पाचजणांना अटक करण्यात आली आहे. या कार्यक्रमांत आयोजकासह सुरक्षारक्षकांनी प्रचंड हलगर्जीपणा केल्याचे उघडकीस आले आहे. या विद्यार्थ्यांनी दारुसह ड्रग्ज आतमध्ये कसे नेले याची चौकशी सुरु आहे. त्यामुळे या गुन्ह्यांत आणखीन काहींच्या अटकेची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. शनिवारी घडलेल्या या घटनेने संबंधित तरुण-तरुणींसह त्यांच्या पालकांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
शनिवारी सायंकाळी गोरेगाव येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, नेस्को सेंटरमध्ये एका हायफाय संगीत लाईव्ह कॉर्न्स्ट आयोजित करण्यात आला होता. या कॉर्न्स्टमध्ये हजाो तरुण-तरुणी सामिल झाले होते. 24 वर्षांची तरुणी ही कॉलेजमध्ये शिकत असून ती तिच्या कॉलेजच्या मित्रांसोबत तिथे गेली होती. रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरु होता. याच कार्यक्रमादरम्यान काही तरुणांसह तरुणींनी मद्यप्राशन केले होते. त्यातच त्यांनी एमडी ड्रग्जच्या गोळ्याचे सेवन केले होते. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना श्वास घेता येत नव्हते. काहीजण तिथे बेशुद्ध होऊन पडले. त्यामुळे या तरुणासह तरुणींना तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यापैकी काहींना नंतर खाजगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते.
उपचारादरम्यान एका तरुणासह तरुणीचा मृत्यू झाला तर एका तरुणीवर अद्याप उपचार सुरु आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जाते. ही माहिती प्राप्त होताच वनराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी संगीत लाईव्ह कॉर्न्स्टमध्ये सहभागी झालेल्या काही तरुणांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यात काही तरुणांनी मद्यप्राशनासोबत ड्रग्जचे ओव्हरडोस घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे दोन्ही मृतांचे रक्ताची तपासणी करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल लवकरच पोलिसांना प्राप्त होणार आहे. या दोघांचे मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते. त्याच्या अहवालाची पोलिसांना प्रतिक्षा आहे. या दोन्ही अहवालानंतर काही गोष्टींचा खुलासा होणार आहे.
दरम्यान या कार्यक्रमांसाठी आयोजकांना मुंबई पोलिसांनी ठराविक वेळेची मर्यादी दिली होती, तरीही रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरु होता. आयोजकांनी मुंबई पोलिसांनी दिलेल्या नियमांचे उल्लघंन केले होते. कार्यक्रमासाठी हजारो तरुण-तरुणींनी तिकिट बुक केले होते. त्यामुळे तिथे अनुचित प्रकार घडू म्हणून खाजगी सुरक्षारक्षक ठेवण्यात आले होते. प्रवेश देण्यापूर्वी सर्वांची तपासणी करण्यात आली होती, तरीही काही विद्यार्थ्यांनी आतमध्ये जाताना मद्यासह ड्रग्ज घेऊन गेले होते. मात्र सुरक्षारक्षकांनी तपासणी करताना हलगर्जीपणा केल्याचे दिसून आले. इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याची माहिती असताना आयोजकांनी योग्य ती खबरदारी घेतली नव्हती असेही तपासात उघडकीस आले आहे.
या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत वनराई पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशांनतर कार्यक्रमाच्या आयोजकासह इतर आरोपीविरुद्ध 105, 125, 125 (बी), 223 (बी), 3 (5) भारतीय न्याय सहिता सहकलम 65 महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम सहकलम 8 (सी), 22, 29 एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत सोमवारी रात्री उशिरापर्यंत आयोजकासह इतर पाचजणांना पोलिसांनी अटक केली होती. या सर्वांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान या घटनेनंतर मुंबई पोलिसाकडून अधिकृतपणे काहीही माहिती देण्यात आली नाही.