रॉबरीच्या उद्देशाने ज्वेलर्स व्यापार्यावर प्राणघातक हल्ला
गुन्हा दाखल होताच नाशिक येथून दोघांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 डिसेंबर 2025
वसई, – रॉबरीच्या उद्देशाने एका ज्वेलर्स व्यापार्याच्या शॉपमध्ये घुसून तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला करुन पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली आहे. त्यात एका महिलेचा समावेश असून या दोघांनी ज्वेलर्स व्यापार्यावर रॉबरीच्या उद्देशाने हल्ला केल्याची कबुली दिली आहे. सोहेल शराफत खान आणि फिरदोसबानो फिरोज खान अशी या दोघांची नावे असून ते दोघेही उत्तरप्रदेशच्या झांसीचे रहिवाशी आहेत. अटकेनंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी वालिव पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
यातील कालूसिंग खरवट हे ज्वेलर्स व्यापारी असून ते वसई येथे राहतात. त्यांचा वसईतील वालीव, शालिमार हॉटेलसमोर अंबिका ज्वेलर्स नावाचे एक सोन्याचे शॉप आहे. 9 डिसेंबरला सकाळी पावणेबारा वाजता ते त्यांच्या शॉपमध्ये होते. यावेळी तिथे एक जोडपे सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा बहाणा करुन आले होते. त्यांना सोन्यांची अंगठी दाखवत असताना अचानक महिलेने मुलासाठी पाण्याची मागणी केली. त्यामुळे ते आतील रुममध्ये पाणी आणण्यासाठी गेले होते. याच दरम्यान या दोघांनी तिक्ष्ण हत्याराने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्यांच्या पोटाला, हातावर, दंडाला, पंज्याला, गालाला आणि हनुवटीला गंभीर दुखापत झाली होती. अचानक झालेल्या आरडाओरडीनंतर ते दोघेही तेथून पळून गेले होते.
ही माहिती प्राप्त होताच वालीव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होात. या घटनेची पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला संमातर तपास करण्याचे आदेश देताना आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्यास सांगितले होते.
या आदेशानंतर गुन्हे शाखेच्या युनिट चारचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, दत्तात्रय सरक, सहाय्यक फौजदार मनोहर तावडे, संतोष मदने, पोलीस हवालदार शिवाजी पाटील, धनंजय चौधरी, प्रविणराज पवार, हनुमंत सूर्यवंशी, रविंद्र भालेराव, विजय गायकवाड, समीर यादव, संदीप शेरमाळे, अश्विन पाटील, विकास राजपूत, सनी सूर्यवंशी, महिला पोलीस हवालदार दिपाली जाधव, मसुब सचिन चौधरी यांनी तपास सुरु केला होता.
ज्वेलर्स शॉपसह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहिती पोलिसांना गुन्ह्यांतील आरोपी नाशिक येथे पळून गेल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने नाशिक रोड येथून सोहेल खान आणि फिरदोसबानो खान या दोघांनाही ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनीच रॉबरीच्या उद्देशाने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर दोन्ही आरोपींना अटक करुन पुढील कारवाईसाठी वालीव पोलिसांकडे सोपविणत आले होते. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.