मयांक ज्वेलर्समधील ७१ लाखांच्या दरोड्याचा पर्दाफाश
चारही आरोपींसह दागिने खरेदी करणार्या व्यापार्याला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ फेब्रुवारी २०२५
भाईंदर – घातक शस्त्रांचा धाक दाखवून ज्वेलर्स दुकानात सुमारे ७१ लाखांचा दरोडा घालून पळून गेलेल्या एका टोळीचा माणिकपूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तपणे केलेल्या कारवाईत पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून तीन आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. अनुज गंगाराम चौगुले, रॉयल ऊर्फ रॉय एडव्हर्ड सिक्वेरा, लालसिंग ऊर्फ सिताराम सर्जेराव मोरे, अमर भारत निमगिरे आणि सौरभ ऊर्फ पप्पू तुकाराम राक्षे अशी या पाचजणांची नावे आहेत. यातील काही आरोपीविरुद्ध यापूर्वी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपींकडून २३ लाख ३९ हजार २०० रुपयांचे २९७ ग्रॅम सोन्याची लगड, एक पिस्तूल, एक जिवंत काडतुस, एक पल्सर बाईक, कोयता, कटर, कटावणी, मोबाईल आदी मुद्देमा हस्तगत केला आहे.
माणिकपूर पोलीस इाण्याच्या हद्दीत हेरिटेज अग्रवाल, लोटस इमारतीमध्ये मयांक ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. १० जानेवारीला रात्री सव्वानऊ वाजता या दुकानात २५ ते ३० वयोगटातील काही तरुण घुसले. या तरुणांनी घातक शस्त्रांचा धाक दाखवून ज्वेलर्स व्यापार्याला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या डोक्यात पिस्तूलने माहाण करुन दुकानातील ७१ लाख रुपयांचे ९४९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले होते. हा प्रकार समजताच माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी रतनलाल छगनलाल सिंघवी या ६९ वर्षांच्या वयोवृद्ध ज्वेलर्स व्यापार्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीविरुद्ध घातक शस्त्रांच्या जोरावर दरोडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत माणिकपूर पोलिसांसह गुन्हे शाखेला संमातर तपास करण्याचे आदेश दिले होते. या आदेशांनतर या अधिकार्यांनी संयुक्तपणे आरोपींचा शोध सुरु केला होता. जवळपास सहाशे सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली. या फुटेजवरुन आरोपी गिरीज टोकपाडा परिसरातून जाताना दिसले. याच दरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहितीवरुन अनुज आणि रॉयल या दोघांना ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनीच त्यांच्या दोन सहकार्यांच्या मदतीने हा दरोडा घातल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या पथकाने लालसिंग आणि सौरभ या दोघांनाही सांतारा येथून ताब्यात घेतले. त्यांनी ते दागिने अमर निमगिरे याला विक्री केले होते. त्यामुळे चोरीचे दागिने खरेदी केल्याप्रकरणी अमरला कर्नाटक येथून पोलिसांनी अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी २३ लाख ३९ हजाराचे चोरीचे दागिन्यांसह गुन्ह्यांतील पिस्तूल, इतर हत्यार, बाईक आदी मुद्देमाल हस्तगत केला.
यातील अनुज, रॉयल आणि लालसिंग हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, रॉबरी, गंभीर दुखापतीसह रॉबरी, अपहरण, हत्येचा पुरावा नष्ट करणे आदी गुन्ह्यांची नोंद आहे. यातील अनुजविरुद्ध खार, कोयना, विक्रमगढ, भायखळा, सीबीडी-सीआयडी, कफ परेड, मरिनड्राईव्ह, आझाद मैदान, मलबार हिल पोलीस ठाण्यात वीस, रॉयलविरुद्ध महाबळेश्वर, माणिकपूर, लोनंद, सीबीडी-सीआयडी, डोंगरी, पंतनगर, नवघर, कोयना, व्ही. पी रोड पोलीस ठाण्यात बारा, लालसिंगविरुद्ध सातारा, कोयनानगर, सातारा शहर पोलीस ठाण्यात तीन गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. या आरोपींच्या अटकेने सातारा वाई आणि सातारा शहर पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ घोगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिलाल जाधव, दिलीप घुगे, पोलीस निरीक्षक बालाजी दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली माणिकपूर आणि वालिव गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील, पोलीस हवालदार शैलेश पाटील, शामेश चंदनशिवे, धनंजय चौधरी, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, पोलीस नाईक बाळू कुटे, पोलीस शिपाई गोविंद लवटे, आनंदा गडदे, प्रविण कांदे, विनायक राऊत, सचिन लांडगे, केतन गोडसे, पोलीस हवालदार भालचंद्र बागुल, पोलीस शिपाई अमोल बर्डे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.