मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – मुलगी झाल्याचे समजताच पत्नीला माहेरी पाठवून नंतर तिचा मानसिक व शारीरिक शोषण करुन विवाहाच्या २१ व्या वर्षांनंतर ५० वर्षांच्या पत्नीला पतीने मोबाईलवरुन तिहेरी तलाक दिल्याचा प्रकार कुर्ला परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरुन विनोबा भावे नगर पोलिसांनी एकाच कुटुंबातील पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यात तक्रारदार महिलेचा पती फिरोज अहमद शफी हौसिल चौधरी याच्यासह सासरच्या इतर चौघेजण शक्ती हौसिल चौधरी, शबीना नियाज अहमद खान, मोमीना अमीर खान आणि आमीना इस्लाम खान यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सागितले.
तक्रारदार महिला कुर्ला येथे तिच्या पती फिरोज अहमद आणि सतरा वर्षांच्या मुलीसोबत राहते. तिच्या पतीचा गॅस एजन्सी आणि पेट्रोपपंपाचा व्यवसाय होता. नोव्हेंबर २००४ साली या दोघांचा विवाह झाला असून त्यांचा विवाहाची रितसर नोंद वांद्रे कोर्टात झाली आहे. लग्नानंतर ती तिचे सासरे शफी हौसिल, सासू इस्लामुनिस्सा, नणंद शबीना, आमीना, मोमीना आणि नणंदच्या मुलासोबत कुर्ला येथे राहण्यासाठी आली होती. लग्नानंतर तिचा पती काहीच काम कत नव्हता. तसेच त्याला नशा करण्याचे व्यसन होते. लग्नानंतर काही महिन्यांत तिची सासू तिला सतत मारहाण तर नणंद क्षुल्लक कारणावरुन सतत टोमणे मारत होते. २००७ साली तिला मुलगी झाली होती. मुलगी झाल्याचे समजताच त्याने तिला तिच्या माहेरी पाठवून दिले होते. जवळपास दोन महिन्यानंतर तिच्या पतीने आपण वेगळे राहू असे सांगून तिला दुसर्या रुममध्ये आणले होते.
याच दरम्यान तो वेगवेगळ्या मैत्रिणींना घरी घेऊन येत होता. जाब विचारल्यानंतर तो तिला सतत मारहाण करुन घरातून हाकलून देण्याची धमकी देत होता. रात्रभर नशा करुन पॉर्न फिल्म पाहत होता. स्वतसह मुलीच्या भविष्याकडे पाहून ती गप्प होती. ऑक्टोंबर २०२४ रोजी फिरोज अहमद हा घरी आला आणि त्याने दुसरे लग्न केल्याचे सांगून स्वतची बॅग भरण्यास सुरुवात केली होती. काही वेळानंतर तो घरातून निघून गेला. काही दिवस दुसर्या पत्नीसोबत राहिल्यानंतर तो तिच्यासोबत उत्तरप्रदेशातील गावी निघून गेला. गावाहून मुंबईत आल्यानंतर तो मिरारोड येथे राहण्यासाठी गेला. तिने अनेकदा त्याच्याकडे विनंती केली, मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केले होते. १० नोव्हेंबर २०२४ रोजी त्याने तिला कॉल करुन तिला तलाक हा शब्द तीनदा उच्चारुन तिच्यापासून घटस्फोट घेतला होता.
या प्रकारानंतर ती प्रचंड मानसिक तणावात आली होती. घडलेला प्रकार तिने तिच्या बहिण आणि आणि इतर नातेवाईकांना सांगितला. पती पुन्हा घरी येईल आणि सर्व सुरळीत होईल असे वाटत असताना त्याने लग्नाच्या २१ व्या वर्षी तिला मुलगी झाल्यानंतर मानसिक व शारीरिक शोषण करुन तिला घटस्फोट दिला. त्यामुळे तिने तिच्या पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध विनोबा भावे नगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तिच्या पतीसह इतर चौघांविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहितासह मुस्लिम महिला कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून पतीसह इतर सर्व आरोपींची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.