मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ जानेवारी २०२५
ठाणे, – सुमारे पाच कोटीच्या व्हेल माशांच्या उलटीसह पुण्यातील एका तरुणाला ठाणे गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. नितीन मुत्तना मोरेलु असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा पुण्याचा रहिवाशी आहे. त्याच्याकडून पाच किलो वजनाचे व्हेल माशांची उलटी पोलिसांनी जप्त केली आहे. पुण्याहून ठाण्यात तो त्याची डिलीव्हरीसाठी आला होता, मात्र त्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली.
ठाण्यातील राबोडी, साकेत कॉम्प्लेक्सकडून क्रिक नाक्याकडे जाणार्या रोडवर काहीजण व्हेल माशांची उलटीची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक दिपक घुगे यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुकत अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अब्दुल मलिक, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाटील, दिपक घुगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरसिंग महापुरे, दयानंद नाईक, पोलीस हवालदार प्रशांत निकुंभ, पोलीस नाईक बडगुजर, पोलीस हवालदार शशिकांत सावंत यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल्या नितीन मोरेलु याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.
त्याच्याकडील सामानाची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्यांना ५ किलो ४८ ग्रॅम वजनाचे व्हेल माशांची उलटी सापडली. या व्हेल माशांची किंमत सुमारे पाच कोटी रुपये इतकी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या माशांच्या उलटीला प्रचंड मागणी आहे. त्याच्यापासून उच्च प्रतीचे अत्तर, सुगंधित द्रव्य तयार केले जाते. तपासात नितीन हा पुण्याचा रहिवाशी असून तो ठाण्यात व्हेल माशांच्या उलटीची डिलीव्हरीसाठी आला होता. मात्र त्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली. त्याला व्हेल माशांची उलटी होणी दिली, तो कोणाला त्याची विक्री करणार होता याचा पोलीस तपास करत आहेत. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.