कारच्या पैशांचा अपहार करुन सिनेअभिनेत्याची फसवणुक

चार भामट्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 मे 2025
मुंबई, – महिंद्रा कंपनीच्या थार कारसाठी घेतलेल्या पावणेनऊ लाखांचा अपहार करुन एका सिनेअभिनेत्याची चारजणांच्या टोळीने फसवणुक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चारही भामट्याविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. विशाल भोसले, प्रदीप प्रकाश गुरव, अविनाश शिंदे, आणि राज आगरकर अशी या चौघांची नावे असून पळून गेलेल्या या चारही भामट्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही फसवणुकीचे गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दलविंदर देवेंदर सिंग हा सिनेअभिनेता असून सध्या अंधेरीतील यारीरोड-वर्सोवा, गंगा जमुना अपार्टमेंटमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतो. तो मूळचा छत्तीसगढच्या पुलगावचा रहिवाशी असून बॉलीवूडमध्ये करिअर करण्यासाठी तो मुंबईत आला होता. त्याने काही हिंदी चित्रपटात काम केले आहे. त्याला स्वतसाठी महिंद्रा कंपनीची थार कार खरेदी करायची होती. त्यासाठी त्याने महिंद्राच्या कारविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. डिसेंबर 2024 पासून तो गुगलवर महिद्रा शोरुमची माहिती सर्च करत होते. याच दरम्यान त्याला अमृता आचरेकर नावाच्या एका महिलेने कॉल केला होता. तिने ती अंधेरीतील शॉपर्स टॉपजवळील जुहू-तारा रोडच्या महिंद्रा शोरुममधून बोलत असल्याचे सांगितले.

तुम्ही महिंद्रा थार कार खरेदीसाठी इच्छुक आहात का अशी विचारणा करुन त्याला कारची माहिती देण्यास सुरुवात केली होती. यावेळी तिने त्याच्याशी महिंद्राच्या कारच्या वेगवेगळ्या कारची माहिती सांगून कारच्या किंमतीबाबत चर्चा केली होती. जानेवारी महिन्यांत तिने त्याला पुन्हा कॉल करुन कारच्या विशेष ऑफरसह डिस्काऊंटबाबत माहिती सांगू असे सांगून शोरुममध्ये बोलाविले होते. 18 जानेवारीला तो त्याच्या एका मैत्रिीसोबत अंधेरीतील शोरुममध्ये गेला होता. तिथेच त्याची अमृताशी ओळख झाली होती. तिने त्यांना आज कार बुक केल्यास एक महिन्यांत डिलीव्हरी मिळेल असे सांगितले. शोरुममध्ये त्यांची हवी असलेली कार नव्हती, त्यामुळे कार बुकिंग न करता घरी आले होते.

21 जानेवारीला अमृताने त्याला कॉल करुन एका व्यक्तीचा मोबाईल क्रमांक दिला. तो त्याला हवी असलेली कार कमी किंमतीत मिळवून देईल असे सांगितले. त्यानंतर त्याने संबंधित मोबाईलवर विशाल या व्यक्तीशी कारविषयी चर्चा केली होती. त्याने त्याला काही कारचे फोटो पाठवून सतरा लाखांमध्ये बजेट असल्याचे सांगितले. पेमेंट केल्यानंतर काही दिवसांत त्याला कारची डिलीव्हरी मिळेल असे सांगितले. 23 जानेवारीने विशालने राज आगरकर नावाच्या एका व्यक्तीचा स्कॅनर पाठविला होता. या स्कॅनरवर स्कॅन करुन त्याने त्याला टप्याटप्याने पैसे पाठविले होते.

दोन दिवसांनी अविनाश नावाचा एक व्यक्ती कार घेऊन त्याच्या घराजवळ आल्याचे विशालने सांगितले. त्यामुळे तो अविनाशला भेटला. त्याने कारची टेस्टड्राईव्ह घेतली होती. त्यानंतर त्याने त्याच्याकडून त्याचे काही वैयक्तिक कागदपत्रे घेतली होती. पार्ट पेमेंटसह बुकींग पेमेंट घेतल्यांनतर अविनाश कार घेऊन गेला. 23 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत त्याने कारसाठी विशाल, प्रदीप, अविनाश आणि राज आगरकर या व्यक्तीच्या बँक खात्यात टप्याटप्याने 8 लाख 72 हजार 294 रुपयांचे पेमेंट केले होते. मात्र दिलेल्या मुदतीत कारची डिलीव्हरी केली नाही. वारंवार विचारणा करुनही ते चौघेही त्याला विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते.

या चौघांकडून कार देण्याचे आश्वासन देऊन आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच दलविंदर सिंग याने वर्सोवा पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. त्याच्या तक्रार अर्जाची शहानिा केल्यानंतर पोलिसांनी विशाल भोसले, प्रदीप गुरव, अविनाश शिंदे आणि राज आगरकर या चारही भामट्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. चारही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page