बिल्डर असल्याची बतावणी करुन आर्टिस्ट महिलेची फसवणुक
फ्लॅटसाठी घेतलेल्या साडेसोळा लाखांचा अपहार केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 जुलै 2025
मुंबई, – बिल्डर असल्याची बतावणी करुन एका आर्टिस्ट महिलेला स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून तिची फसवणुक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. फ्लॅटसाठी घेतलेल्या साडेसोळा लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी कथित बिल्डरसह त्याच्या सहकार्याविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बाबू आनंद सिंदाल आणि मोहम्मद इक्बाल अजीमखान अहमद अशी या दोघांची नावे असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
32 वर्षांची तक्रारदार आर्टिस्ट असून ती अंधेरीतील वर्सोवा-यारी रोड परिसरात राहते. ती फिल्म इंडस्ट्रिजमध्ये कामाला तर तिचे पती अॅक्टिंग शिकवण्याचे काम करते. मोहम्मद इक्बाल हा त्यांच्या परिचित असून ते एकमेकांना आठ वर्षांपासून ओळखतात. मे 2023 रोजी त्याने त्यांची ओळख बाबू सिंदालशी करुन दिली होती. बाबू हा बिल्डर असून तो अंधेरीतील वर्सोवा, मांडवी गल्लीत कल्पेश हाऊस नावाच्या एका इमारतीचे बांधकाम करत आहे. या इमातरीमध्ये त्यांनी एक फ्लॅट बुक करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांनी इमारतीच्या बांधकाम साईटची पाहणी केली होती, यावेळी त्यांना तिथे इमारतीचे बांधकाम सुरु असल्याचे दिसून आले.
त्यामुळे त्यांनी तिथे 400 चौ. फुटाचा एक फ्लॅट बुक करताना त्याला टप्याटप्याने साडेसोळा लाख रुपये दिले होते. मात्र त्यांनी दिलेल्या मुदतीत त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. ही इमारत वादाच्या भोवर्यात सापडली असून इमारतीचे बांधकाम थांबले असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी पुन्हा बांधकाम साईटची पाहणी केली होती. चौकशीदरम्यान बाबू सिंदाल हा बिल्डर नसून तो तिथे कॉन्ट्रक्टर म्हणून काम करत असल्याचे तिला समजले होते.
बाबूसह मोहम्मद इक्बालकडून फसवणुक झाल्याचे तिने त्यांच्याकडे फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांनी तिला साडेसोळा लाख रुपये व्याजासहीत परत केले नाही. त्यामुळे तिने या दोघांविरुद्ध वर्सोवा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर बाबू सिंदाल आणि मोहम्मद इक्बाल या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत त्यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.