मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ जुलै २०२४
मुंबई, – सार्वजनिक रहदारीचा रस्ता नसताना चौपाटी आणलेल्या कारची धडक लागून झालेल्या अपघातात गणेश विक्रम यादव या ३६ वर्षांच्या रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालकासह दोघांविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून चौपाटीवर झोपलेल्या एका रिक्षाचालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. कारचा क्रमांक प्राप्त होताच पळून गेलेल्या कारचालकासह त्याच्या मित्राला काही तासांत वर्सोवा पोलिसांनी अटक केली. निखील दिलीप झवाते नागपूर आणि शुभम अशोक डोंगरे अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हा अपघात सोमवारी सकाळी पावणेसहा वाजता अंधेरीतील सातबंगला, सागर कुटीर चौपाटी, सागर कुटीर सहकारी गृहनिर्माण इमारतीसमोर झाला. या परिसरातील सागर कुटीर रहिवाशी संघात बबलू सुमीरन श्रीवास्तव हा राहत असून तो डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो. मृत गणेश हा त्याचा मित्र असून रिक्षाचालक आहे. अनेकदा ते चौपाटीवरील रेतीवर झोपतात. सोमवारी रात्री ते दोघेही नेहमीप्रमाणे चौपाटीवरील रेतीवर झोपले होते. पहाटे पावणेपाच वाजता त्याच्या हाताला आणि चेहर्याला काहीतरी घासून गेल्याचा भास झाला. त्यामुळे त्याला जाग आली, यावेळी त्याला सार्वजनिक रहदारीचा रस्ता नसताना एक व्यक्ती कार घेऊन चौपाटीवर आला होता. त्याच्या कारची धडक लागून गणेश यादव हा जखमी झाला तर त्याच्या हाताला आणि चेहर्याला किरकोळ दुखापत झाली होती. या घटनेनंतर तिथे स्थानिक रहिवाशी जमा झाले होते. अपघातानंतर कारचालकासह त्याचा मित्र खाली उतरले, मात्र लोकांना पाहून त्यांनी जखमी झालेल्या गणेशला कुठलीही वैद्यकीय मदत तसेच पोलिसांना अपघाताची माहिती न देता पलायन केले होते. त्यानंतर स्थानिक रहिवाशांना जखमी झालेल्या गणेशला तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. किरकोळ दुखापत झालेल्या बबलू श्रीवास्तवला प्राथमिक औषधोपचार करुन सोडून देण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी बबलू श्रीवास्तवच्या जबानीवरुन पोलिसांनी कारचालकासह त्याच्या मित्राविरुद्ध १०५, १२५ (अ), २३९, २८१, ३ (५) भारतीय न्याय सहिता सहकलम १३४ (ब), (अ) मोटारवाहन अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
कारचा क्रमांक प्राप्त होताच पोलिसांनी पळून गेलेल्या दोन्ही आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांच्या पथकाने निखिल झवाते आणि शुभम डोंगरे या दोघांना काही तासांत अटक केली. त्यांची मेडीकल करण्यात आली असून त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही. या अहवालानंतर त्यांनी अपघाताच्या वेळेस मद्यप्राशन केले होते की नाही याचा खुलासा होणार आहे. अटकेनंतर या दोघांनाही मंगळवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस तपासात निखिल आणि शुभम हे दोघेही नागपूरचे रहिवाशी आहे. अपघाताच्या वेळेस निखिल कार चालवत होता. ही कार त्यांच्या मालकाची आहे. ते काही दिवसांपूर्वी नागपूर येथून लोणावळा आणि नंतर मुंबईत आले होते. सोमवारी रात्री मित्राला अंधेरीतील लोखंडवाला संकुल येथे सोडून ते सातबंगला येथील सागर कुटीर चौपाटीवर आले होते. यावेळी चौपाटीवर झोपलेल्या गणेश यादवचा अंदाज न आल्याने निखिलने कारने त्याला धडक दिली होती. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता.