मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
8 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – एखाद्या व्यक्तीला देवदर्शन घडवणं, हे हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठ्याचे पुण्याचे काम मानले जाते. आपल्या आई-वडिलांना श्रावण बाळाने देवदर्शन घडवलं आणि तो पुराणात अजरामर झाला. तसेच आजच्या कलयुगातही कोणाला देवदर्शन घडवलं तर ते पुण्याचे काम मानले जाते. तसे पुण्याचे काम केले आहे कॅप्टन राकेश कोयलू आणि अजय कौल यांनी. त्यांनी शंभरहून अधिक महिलांना देवदर्शन घडवलं आहे. तर झालं असं काही कॅप्टन राकेश कोयलू यांच्याकडे काही महिलांनी अक्कलकोट येथे जाऊन स्वामी समर्थांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. या महिलांपैकी अनेकांची आर्थिक परिस्थिती हालाकीची होती. त्यांनी अक्कलकोट येथे जाणे शक्य नव्हतं. त्यामुळे कॅप्टन राकेश कोयलू यांच्या मनात एक योजना आली, आपण या सर्व महिलांना आपल्या खर्चातून देवदर्शन घडवायचं. त्यानुसार मग त्यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली. कॅ. कोयलू यांनी चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूल (सीडब्ल्यूसी) आणि क्लारा काॅलर्स आॅफ काॅमर्सचे संस्थापक आणि प्राचार्य अजय कौल यांच्याशी याबाबत चर्चा केली. इतक्या मोठ्या संख्येने महिलांना देवदर्शन घडवायची योजना कौल यांनाही आवडली. अजय कौल यांनी कॅ. कोयलू यांना मदतीचे आश्वासन दिले. त्यांनी देवदर्शनाची योजना हळहळू कार्यरत झाली. शंभरहून अधिक महिला. त्यात सत्तर टक्के वयोवृद्ध महिला. त्यांच्या प्रवासाची, आरोग्याची काळजी घ्यायची. त्यांची अक्कलकोट येथे जाण्यायेण्याची तसेच तेथे राहण्याची, खाण्यापिण्याची सोय करायची ठरले. ही ट्रीप पूर्णपणे मोफत होती. कॅ. कोयलू आणि अजय कौल यांनी सर्व खर्चाची जबाबदारी उचलली. महिलाही आनंदी झाल्या. पदराचा एकही रुपया खर्च न करता, त्यांना देवदर्शन होणार होते. शुक्रवारी ३ आॅक्टोबरला या सर्व महिलांना खाजगी बसने सीएसएमटी येथे नेण्यात आले होते. त्यावेळी या महिलांच्या मनात स्वामी समर्थांचा जयघोष तर होताच पण त्या सर्व कॅ. कोयलू आणि अजय कौल यांना धन्यवाद देत होत्या. सीएसएमटीवरून त्या महिला ट्रेनने अक्कलकोटला निघाल्या. त्यांची योग्य ती सोय करण्यात आली असल्यामुळे या महिलांना कुठेही गैरसोय झाली नाही. बऱ्याच दिवसांची त्यांची इच्छा पूर्ण झाली होती. अर्थात त्यासाठी त्या कॅ. कोयलू आणि अजय कौल यांना एकसारख्या धन्यवाद देत होत्या. या सर्व महिला अंधेरी, लोखंडवाला काॅम्प्लेक्स, जोगेश्वरी, ओशिवरा येथे राहणाऱ्या होत्या. एकता मंच एजीओ, द ओशिवरा-लोखंडवाला सिनिअर सिटीझन फाऊंडेशन यांच्याकडून या ट्रीपचे आयोजन करण्यात आले होते. पण ट्रीपचे सर्वेसर्वा होते कॅ. कोयलू आणि अजय कौल. आजही या महिला या दोघांना देवदर्शन घडवल्याने आशीर्वाद देत आहेत.