शिवीगाळ करुन वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न
सीट बेल्ट लावला म्हणून कारवाई करताना घडलेला प्रकार
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१४ ऑगस्ट २०२४
मुंबई, – अश्लील शिवीगाळ तसेच धमकी देऊन एका वाहतूक पोलीस शिपायाशी तिघांनी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी कर्तव्य बजाविणार्या पोलिसांना शिवीगाळ करुन धमकी देणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत अद्याप कोणालाही अटक झाली नसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसाकडून सांगण्यात आले. अद्वैत आनंद, कपिल आनंद आणि साधना आनंद अशी या तिघांची नावे आहेत. सीट बेल्ट लावला नाही म्हणून कारवाई करताना हा प्रकार घडला होता.
गणेश मधुकर सोनावणे हे मानखुर्दच्या महाराष्ट्रनगरात राहत असून डी. एन नगर वाहतूक चौकीत पोलीस शिपाई म्हणून कामाला आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजता ते अंधेरीतील चार बंगला, म्हाडा कॉलनी जंक्शनजवळ कर्तव्य बजावत होते. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस शिपाई भरत चौधरी हेदेखील होते. सायंकाळी सात वाजता त्यांना एका कारचालकाने सिट बेल्ट लावला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी कारचालकाला कार बाजूला करण्याचा इशारा केला असता त्याने अश्लील हातवारे करुन काही अंतरावर गेल्यानंतर कार थांबविली. यावेळी सीट बेल्ट न लावल्याने त्यांनी कारचा फोटो काढून ई मशिनद्वारे कारवाई करत होते. त्याचा राग आल्याने कारमधून एक वयोवृद्ध महिला खाली उतरली आणि तिने त्यांना कारवाई करण्यास विरोध करुन गणेश सोनावणे यांना अश्लील शिवीगाळ केली. त्यामुळे त्यांनी तिला शिवीगाळ करु नका असे सांगून तिचे मोबाईलवरुन शूटींग सुरु केले होते. शूटींग सुरु असतानाही या महिलेसह तिच्या पतीने त्यांच्याशी हुज्जत घालून शिवीगाळ करुन त्यांना बघून घेण्याची धम्की दिली होती. तिथे प्रचंड गांेंधळ घालून या तिघांनी सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. ही माहिती मिळताच वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
चौकशीदरम्यान या तिघांची नावे अद्वैत आनंद, कपिल आनंद आणि साधना आनंद असल्याचे समजले. या तिघांनाही पोलीस ठाण्यात येण्यास सांगून ते हॉस्पिटलला जायचे आहे असे सांगून कारमधून बसून निघून गेले. या घटनेनंतर गणेश सोनावणे यांनी तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अद्वैत, कपिल आणि साधना आनंद यांच्याविरुद्ध ३५२, ३५१ (२), २२१, १३२, १२१ (१) भारतीय न्याय सहिता अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या तिघांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.