वर्सोवा जेट्टीतून वाळू चोरी करणार्या चौकडीला अटक
9200 किलो वाळू चोरीचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
16 जुलै 2025
मुंबई, – अंधेरीतील वर्सोवा जेट्टी समुद्रकिनार्यावर वाळू चोरी करणार्या एका चौकडीला वर्सोवा पोलिसांनी अटक केली. जावेद सबरमुल्ला, अमन शेख, अप्पू सहानी आणि साईनाथ कसबे अशी या चौघांची नावे असून या चौघांनी 9200 किलो वाळू चोरीचा प्रयत्न केला होता, मात्र हा प्रयत्न गस्त घालणार्या पोलिसांनी हाणून पाडला. एका बिल्डरसाठी त्यांनी वाळू चोरीचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या चौघांनाही नोटीस देऊन सोडून देण्यात आले.
मंगळवारी वर्सोवा पोलिसांचे एक विशेष पथक परिसरात गस्त घालत होते. सकाळी आठ वाजता काहीजण किनार्यावर खोदकाम करताना पोलिसांच्या निदर्शनास आले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच पोलिसांनी तिथे धाव घेतली होती. यावेळी खोदकाम करणार्या चारही आरोपींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनी वाळू चोरीचा प्रयत्न करत असल्याचे उघडकीस आले. यावेळी त्यांनी समुद्रकिनार्यावरील काढलेल्या वाळूच्या सात फायबर बोटीवर चारशे पोत्या भरल्याचे दिसून आले. आणखीन 108 पोत्या भरण्याचे काम सुरु होते. अशा प्रकारे त्यांनी 9200 किलो वाळू चोरीचा प्रयत्न केला होता.
घटनास्थळाहून पोलिसांनी सात फायबर बोटी, 400 पोत्यामध्ये भरलेली पोती, सात विळा, रिकाम्या पोत्या आदी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासात त्यांना ती वाळू एका बांधकाम व्यावसायिकाला विकायची होती, मात्र त्यापूर्वीच या चौघांनाही गस्त घालणार्या पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. अटकेनंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले.