बँक अधिकार्‍याच्या सतर्कमुळे फसवणुकीचा प्रकार उघड

आर्ट डायरेक्टर महिलेच्या तक्रारीवरुन अज्ञात ठगाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० सप्टेंबर २०२४
मुंबई, – विदेशातून युरो चलन आणि सोने आणल्याची बतावणी करुन दंडासह सुटकेसाठी मित्राला पैसे पाठविण्यासाठी बँक गेलेल्या मैत्रिणीला बँक अधिकार्‍यांनी सहजच पैशांविषयी विचारणा केली, यावेळी तिने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर बँक अधिकार्‍याच्या सतर्कमुळे ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर आर्ट डायरेक्टर असलेल्या मैत्रिणीने वर्सोवा पोलिसांनी तिच्या कथित मित्राविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीनंतर आरोपी मित्राविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु आहे.

४३ वर्षांची तक्रारदार महिला आर्ट डायरेक्टर असून ती अंधेरीतील वर्सोवा परिसरात राहते. तिचे टिंझर ऍपवर एक अकाऊंट असून या अकाऊंटवर ती तिच्या मित्र-मैत्रिणीच्या संपर्कात राहते. सप्टेंबर महिन्यांत याच अकाऊंटवरुन तिची अदविककुमार नावाच्या एका अज्ञात तरुणासोबत ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. याच दरम्यान त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केले होते. त्यानंतर ते सोशल मिडीयासह मोबाईलववरुन एकमेकांच्या संपर्कात होते. ११ सप्टेंबरला त्याने तिला फोन करुन तो भारतात येणार असल्याचे सांगितले होते. १६ सप्टेंबरला त्याने तिला कॉल करुन तो दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर असून त्याच्याकडे युरो चलन आणि सोने आहे. त्यामुळे कस्टम अधिकार्‍यांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ते चलन आणि सोने डिकरेरेशनसाठी त्याला भारतीय मूल्य भरावे लागणार आहे. त्यामुळे तिने त्याला पैसे पाठवावे अशी विनंती केली होती. त्याच्यावर विश्‍वास ठेवून तिने त्याला टप्याटप्याने ३ लाख ३७ हजार ३०० रुपये पाठविले होते. ही रक्कम ऑनलाईन ट्रान्स्फर केल्यानंतर त्याने तिला पुन्हा कॉल करुन आणखीन पाच लाखांची मागणी केली.

ही रक्कम दिल्यानंतर त्याची कस्टम अधिकार्‍यांकडून सुटका होईल असे सांगून त्याने तिला पैशांची व्यवस्था करण्याची विनंती केली होती. त्यामुळे ती बँकेत गेली होती. यावेळी बँक अधिकार्‍याने तिला इतक्या पैशांची का आवश्यकता आहे याबाबत सहजच विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. ही माहिती ऐकल्यानंतर त्याने तिला हा सायबर फ्रॉड असल्याचे सांगून पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे तिने वर्सोवा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अदविककुमार या सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page