मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 फेब्रुवारी 2026
मुंबई, – सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच जन्मदात्या पित्याने अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याची घटना अंधेरीतील वर्सोवा परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून याच गुन्ह्यांत बुधवारी रात्री उशिरा आरोपीला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना बुधवारी उघडकीस येताच स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
बळीत मुलगी ही सतरा वर्षांची असून अंधेरीतील वर्सोवा परिसरात राहते. ती सध्या शिक्षण घेत असून आरोपी तिचा पिता आहे. मंगळवारी सायंकाळी ती तिच्या पित्यासोबत घरीच होती. यावेळी आरोपी तिच्या मागे जाऊन तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. साडेसहा वाजता ती घरात काम करताना त्याने तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. तिला मिठीत घेऊन तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला.
तिच्याशी अश्लील भाषेत संभाषण केले. तिची आई त्याला शारीरिक सुख देत नसल्याचे सांगून तिला फोन करुन घरी बोलव. तिला आज जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती. इतकेच नव्हे तर आईवरुन तिला त्याने बेदम मारहाण केली होती. या प्रकारानंतर ती प्रचंड घाबरली होती. त्यामुळे ती घरातून बाहेर पळून गेली. घरातून पळून गेल्यानंतर ती वर्सोवा पोलीस ठाण्यात आली आणि तिथे उपस्थित पोलिसांना तिने घडलेला प्रकार सांगून तिच्या पित्याविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी तिच्या तक्रारीवरुन तिच्या पित्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीला रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी दिडोंशीतील पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.