अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन फसवणुक
२१ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑगस्ट २०२४
मुंबई, – सोशल मिडीयावर अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन एका नामांकित कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्याची अज्ञात सायबर ठगांनी सुमारे २१ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी या अधिकार्याच्या तक्रारीवरुन सायबर सेल पोलिसांनी या ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. गेल्या काही वर्षांत अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली असून ही एक टोळीच कार्यरत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
४६ वर्षांचे तक्रारदार माहीम परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. ते एका खाजगी कंपनीत प्रोग्रामर म्हणून काम करतात. १६ जूनला ते फेसबुक पाहत असताना त्यांच्या मोबाईलवर पूनम शर्मा नावाच्या एका महिलेची फें्रण्ड रिक्वेस्ट आली होती. कुठलीही शहानिशा न करता त्यांनी ती फें्रण्ड रिक्वेस्ट स्विकारली होती. त्यानंतर त्यांच्यात व्हॉटअप चॅट सुरु झाले होते. या चॅटदरम्यान तिने त्यांना ती दिल्लीतील रहिवाशी असून एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करते असे सांगितले होते. त्याच दिवशी ते बाथरुममध्ये फे्रेश होण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना पूनमचा व्हिडीओ कॉल आला होता. त्याने कॉल घेतल्यानंतर समोर त्यांना एक महिला तिचे अंगावरील कपडे काढत असल्याचे दिसून आले. या प्रकारानंतर त्यांनी तो कॉल बंद केला होता. दोन दिवसांनी त्यांना पूनमचा मॅसेज आला होता. त्यात तिने त्यांचा अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केला असून तो सोशल मिडीयावर व्हायरल करणार असल्याची तिने त्यांना धमकी दिली होती. काही वेळानंतर तिने त्यांच्यातील व्हिडीओ कॉलचे रेकॉडिंग झालेला व्हिडीओ पाठविला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी तिला मॅसेज करुन तो व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करु नकोस अशी विनंती केली.
२० जूनला त्यांना आयपीएस अधिकारी असलेल्या दिनेशकुमार नावाच्या एका व्यक्तीने कॉल करुन त्यांचा एक व्हिडीओ पोलिसांना प्राप्त झाला आहे. हा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईल. त्यांच्यावर अटकेची कारवाई करावी लागेल अशी धमकी दिली होती. यावेळी त्याने त्यांना एक मोबाईल क्रमांक देताना संबंधित व्यक्तीला तातडीने कॉल करुन तो व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करु नये म्हणून विनंती करण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी संबंधित व्यक्तीला कॉल केला होता. यावेळी त्या व्यक्तीने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. बदनामीच्या भीतीने त्यांनी त्याला काही पैसे पाठविले. ३ जुलैला दिलीपकुमारने त्यांना पुन्हा कॉल करुन पूनम या महिलेने आत्महत्या केली आहे. तिच्या सुसायट नोटमध्ये त्यांचे नाव व मोबाईल क्रमांक आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक होईल असे सांगितले. यावेळी त्यांनी तिच्या आत्महत्येमागे त्यांचा काहीही संबंध नाही. तसेच त्यांना मदत करण्याची विनंती केली.
यावेळी दिलीपकुमारने गुन्ह्यांतील डॉक्टर, पोलीस आणि पूनमच्या नातेवाईकांना मॅनेज करावे लागेल. त्यासाठी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यामुळे त्यांनी दिलीपकुमारने दिलेल्या बँक खात्यात २१ लाख ३९ हजार ५०० रुपये ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम पाठवूनही त्यांना सतत ब्लॅकमेल करुन सतत पैशांची मागणी होत होती. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी सायबर हेल्पलाईनसह सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी ३०८ (२), ३१८ (४), ३१९ (२), ३३६ (२), (३), ३३८, ३४० (२), ३ (५) भारतीय न्याय सहिता सहकलम ६६ (सी), ६६ (डी) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.