मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ जुलै २०२४
मुंबई, – गृहनिर्माण संस्थेशी संबंधित वादातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी विधानभवनात आलेल्या एका महिलेने मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्याने मानसिक नैराश्यातून स्वतच्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला आहे. त्यात तिला किरकोळ दुखापत झाली असून तिच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले आहे. त्यानंतर तिचे समपुदेशन करुन तिला घरी पाठविण्यात आले होते.
तारा साबळे असे या महिलेचे नाव असून ती ठाण्यातील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तिचे गृहनिर्माण संस्थेशी संबंधित एक वाद असून या वादामुळे ती काही दिवसांपासून मानसिक तणावात होती. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आली होती. मात्र राज्य अधिवेशन सुरु असल्याने तिची मुख्यमंत्र्यासोबत भेट झाली नाही. त्यामुळे तिने तिच्याकडून ब्लेडने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. हा प्रकार तिथे उपस्थित पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी तिला ताब्यात घेतले होते. तिच्यावर जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये प्राथमिक औषधोपचार करण्यात आले. त्यानंतर तिला पुढील चौकशीसाठी मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. समुपदेशानंतर तिला तिच्या घरी सोडण्यात आले.