वेबसिरीजच्या ऑडिशनसाठी बोलावून अनेक तरुणींची फसवणुक

दिग्दर्शक विकास बहल यांच्या नावाचा गैरवापर झाल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 डिसेंबर 2025
मुंबई, – नेटफ्लिक्सवर एका नवीन वेबसिरीजची निर्मितीचे काम सुरु असल्याची बतावणी करुन ऑडिशनसाठी बोलावून काही तरुणांची अज्ञात व्यक्तीने फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार खार परिसरात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीने फसवणुकीसाठी निर्माता-दिग्दर्शक विकास बहल यांच्या नावाने इंटाग्रामवर एक बोगस अकाऊंट उघडले होते, अनेक तरुणींना तो स्वत विकास बहल तसेच नेटफ्लिक्सचा सीईओ असल्याची बतावणी करत होता. काही तरुणींकडून त्याने अर्धनग्न बिकिनीतील फोटो पाठविण्यास प्रवृत्त केले होते. हा प्रकार विकास बहल यांच्या लक्षात येताच त्यांनी खार पोलिसात तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

विकास हरिश बहल हे बॉलीवूडचे नामांकित चित्रपट निर्माता-दिग्दर्शक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत खार परिसरात राहतात. त्यांनी आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. त्यांचे सोशल मिडीयावर अकाऊंट असून या अकाऊंटमार्फत ते त्यांच्या व्यावसायिक आणि खास मर्जीतील लोकांच्या संपर्कात राहतात. 30 सप्टेंबरला ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांच्या दिल्लीतील रहिवाशी असलेल्या नंदन सिंग नावाच्या एका मित्राने कॉल केला होता. त्याने त्यांच्या नावाने इंटाग्रामवर एक बोगस अकाऊंट उघडण्यात आले आहे. संबंधित अकाऊंटधारक विविध व्यक्तींशी संपर्क साधून, प्रतिष्ठित कुटुंबातील तरुणींना मॅसेज करुन भेटण्यासाठी तसेच ऑडिशनसाठी बोलवत आहे.

ही माहिती ऐकल्यानंतर त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी स्वतहून या अकाऊंटची पाहणी केली होती. यावेळी त्यांना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या नावाने अकाऊंट उघडून त्यांच्या नावाचा गैरवापर केल्याचे दिसून आले. 15 नोव्हेंबरला त्यांना एका तरुणीचा कॉल आला होता. तिने त्यांना त्यांच्या इंटाग्राम आयडीवरुन तिला वारंवार मॅसेज येत आहे. समोरील व्यक्ती स्वतला विकास बहल असल्याचे सांगून ऑडिशनसाठी बोलवत आहे. नेटफ्लिक्सवर एका नवीन वेबसिरीज सुरु आहे. त्यासाठी तुम्ही ऑडिशनसाठी मुंबईत या असे सांगून त्याने तिला घाटकोपर येथील सिटी मॉलमध्ये बोलाविले होते. तिथे तिची संबंधित व्यक्तीशी ओळख झाली होती.

त्यांना अशाच प्रकारे इतर काही तरुणींसह महिलांचे कॉल येऊ लागले. त्यांना त्याने तो नेटफ्लिक्सचा सीईओ असल्याचे सांगितले होते, मात्र प्रत्यक्षात भेटल्यानंतर तो बोगस व्यक्ती दिसून आला होता. त्यापैकी एका तरुणीला तो पवई येथे भेटला होता. या भेटीत त्याने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करुन तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तिने त्याला सक्त ताकिद दिली होती. यातील बहुतांश तरुणींना त्याने अर्धनग्न बिकिनी फोटो पाठविण्यास प्रवृत्त केले होते. वेबसिरीजमध्ये चांगली भूमिका मिळत असल्याने काही तरुणींनी त्याला अर्धनग्न बिकीनीतील फोटो पाठविले होते.

20 ऑक्टोंबर ते 26 नोव्हेंबर 2025 या कालावधीत त्यांच्या नावाने संबंधित व्यक्तींना ऑडिशनच्या नावाने मुंबईतील विविध ठिकाणी बोलावून त्यांची फसवणुक केली, त्यांच्याकडून त्यांचे अश्लील फोटो घेतले होते. हा प्रकार गंभीर असल्याने त्यांनी खार पोलिसांना हा प्रका सांगून संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करुन लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी संबंधित तरुणींना जिथे जिथे भेटला या सर्व परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरु असून या गुन्ह्यांत त्याला लवकरच अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page