मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ डिसेंबर २०२४
मुंबई, – शाळेच्या मुख्याधापकानेच एका तेरा वर्षांच्या अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याचा माणुसकीला काळीमा फासणारी घटना विक्रोळी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी संतप्त पालकांनी शाळेत मोर्चा काढून आरोपी मुख्याधापकाला जाब विचाररुन त्याला विक्रोळी पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच ४४ वर्षांच्या आरोपी मुख्याधापकाला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
४० वर्षांची तक्रारदार महिला विक्रोळीतील टागोरनगर परिसरात राहते. तिला तेरा वर्षांची मुलगी असून ती याच परिसरातील एका शाळेत शिकते. याच शाळेत अवधेश नावाचा ४४ वर्षांचा आरोपी मुख्याधापक म्हणून कामा करतो. जुलै महिन्यांत ही मुलगी वर्गात बसली होती. यावेळी तो तिथे आला आणि तिला पाहून सर्वासमोर देखो चॉंद का तुकडा आया है असे म्हणाला. त्यानंतर त्याने तिच्या पाठीवरुन हात फिरवून तिच्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता. याच दरम्यान तिने पीटी ड्रेस घातला नव्हता. त्यामुळे त्याने तिला जवळ बोलावून तिचे नाव विचारुन तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तिच्या छातीकडे अश्लील नजरेने पाहून तिला गाणे म्हणण्यास सांगितले. गेल्या जुलै ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत शाळेचा मुख्याधापकाकडून या मुलीशी अश्लील संभाषणासह जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु होता.
हा प्रकार अलीकडेच मुलीकडून तिच्या आईला समजला होता. त्यानंतर तिने इतर पालकांच्या मदतीने शाळेत जाऊन त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी शाळेत तिच्यासह इतर पालकांनी प्रचंड गोंधळ घातला होता. ही माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलिसांनी आरोपी मुख्याधापकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी बळीत मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी मुख्याधापकाला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.