बाईकच्या धडकेने २४ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू

अपघातानंतर आरोपी बाईकस्वाराचे पलायन

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ मे २०२४
मुंबई, – बाईकच्या धडकेने रस्ता क्रॉस करणार्‍या एका २४ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी विक्रोळी परिसरात घडली. मृत तरुणाचे नाव सुनिल शिवनाथ राजपूत असून तो एका कॉल सेंटरचा कर्मचारी आहे. अपघातानंतर आरोपी बाईकस्वार पळून गेला असून त्याच्याविरुद्ध विक्रोळी पोलिसांनी हलगर्जीपणाने बाईक चालवून एका तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा बाईकचा क्रमांक पोलिसांना मिळाला असून त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.

हा अपघात सोमवारी दुपारी एक वाजता विक्रोळीतील भांडुप पाचखड्डाजवळील पूर्व दुतग्रती महामार्गावरील उत्तर वाहिनीवर झाला. अनिल शिवनाथ राजपूत हा ठाण्याच्या घोडबंदर रोड, कासारवडवलीच्या कोठार चाळीत राहत असून मृत सुनिल हा त्याचा लहान भाऊ आहे. तो एका खाजगी कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये कामाला आहे. साोमवारी दुपारी एक वाजता तो पाचखड्डाजवळील पूर्व दुतग्रती महामार्गावर रस्ता क्रॉस करत होता. यावेळी तेथील भरवेगात जाणार्‍या एका बाईकस्वाराने त्याला धडक दिली. या अपघातात सुनिल हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला विक्रोळीतील महात्मा फुले हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याची दुखापत गंभीर असल्याने त्याला नंतर राजावाडी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. ही माहिती नंतर त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली होती. याप्रकरणी अनिल राजपूत याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी बाईकस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page