मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – विक्रोळीतील अपघातात एका ६१ वर्षांच्या वयोवृद्धाचा मृत्यू झाला. मनोज मेघजी सोनाघेला असे या वयोवृद्धाचे नाव असून भरवेगात स्कूटी चालविणे त्यांच्या जिवावर बेतल्याचे बोलले जाते. याप्रकरणी विक्रोळी पेालिसांनी मनोज सोनोघेला यांच्याविरुद्ध हलगर्जीपणाने स्कूटी चालवून स्वतच्याच मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
हा अपघात शुक्रवारी सकाळी अकरा ते सव्वाअकराच्या सुमारास विक्रोळीतील पूर्व दुतगती महामार्गावरील मुंबई-ठाणे वाहिनीच्या ऐरोली ब्रिजच्या उतरणीच्या दक्षिण वाहिनीवर झाला. महेश निंबा पाटील हे विक्रोळी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी सकाळी ते पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत होते. यावेळी पूर्व प्रादेशिक कंट्रोल रुममधून ऐरोली ब्रिजवर अपघात झाला असून पोलीस मदत हवी आहे असा कॉल आला होता. त्यानंतर विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तोपर्यंत जखमी व्यक्तीला काही लोकांनी विक्रोळीतील गोदरेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. चौकशीदरम्यान मृत व्यक्तीचे नाव मनोज सोनाघेला असून ते मुलुंड येथील विनानगर, फेज दोनमध्ये राहत होते. शुक्रवारी सकाळी ते त्यांच्या स्कूटीवरुन विक्रोळीच्या दिशेने जात होते. त्यांची स्कूटी सकाळी सव्वाअकरा वाजता ऐरोली ब्रिजच्या उतरणीच्या दक्षिण वाहिनीवर आली असता त्यांचा स्कूटीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्यांची स्कूटी स्लीप झाली आणि ते गंभीररीत्या जखमी झाले होते. उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी काही प्रत्यक्षदर्शीची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यांच्या जबानीवरुन या अपघाताला मनोज हेच जबाबदार असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांनी अपघाताची नोंद केली होती.