मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ डिसेंबर २०२४
मुंबई, – भरवेगात जाणार्या अज्ञात वाहनाच्या धडकेने राजेश विजय बोभाटे या ४२ वर्षांच्या बाईकस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अपघाताची नोंद करुन अपघातानंतर पळून गेलेल्या वाहनचालकाचा शोध सुरु केला आहे.
हा अपघात बुधवारी सकाळी साडेआठ वाजता विक्रोळीतील भांडुप पाचखड्डा, भांडुप बसस्टॉपजवळ झाल्याचे पोलिसांनी सांगितले. विनायक विजय बोभाटे हा बोरिवली परिसरात राहतो. मृत राजेश हा त्याचा लहान भाऊ असून तो ठाण्यातील घोडबंदर रोड, ब्रम्हांड सोसायटीमध्ये राहतो तर अंधेरीतील एका बिल्डरकडे कामाला होता. अनेकदा कामावर येताना राजेश हा त्याच्या ऍक्टिव्हा बाईकचा वापर करत होता. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता विनायक हा कामावर जात असताना राजेशच्या पत्नीने त्यांना फोन करुन राजेशचा विक्रोळी येथे अपघात झाल्याची माहिती देऊन त्याला राजावाडी हॉस्पिटलमध्ये नेल्याचे सांगितले. त्यानंतर ते लगेचच राजावाडी हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना राजेशला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे समजले.
चौकशीअंती राजेश हा बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे अंधेरी येथे कामावर निघाला होता. त्याची ऍक्टिव्हा बाईक पूर्व दुतग्रती महामार्गावरुन भांडुपच्या पाचखड्डा, भांडुप बसस्टॉपजवळ येताच भरवेगात जाणार्या एका अज्ञात वाहनाने त्याच्या ऍकिव्हा बाईकला धडक दिली होती. या अपघातात त्याची बाईक स्लीप झाली आणि तो गंभीररीत्या जखमी झाला होता. अपघाताची माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी अवस्थेत राजेशला तातडीने घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला सकाळी पावणेदहा वाजता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी विनायक बोभाटे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भरवेगात वाहन चालवून एका ऍक्टिव्हा बाईकस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर चालक पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.