मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ जानेवारी २०२५
मुंबई, – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद, छोटा शकील आणि बिष्णोईच्या नावाने एका रियल इस्टेट व्यावसायिकाला अज्ञात व्यक्तीने खंडणीसाठी धमकी दिली आहे. आधी तीन कोटी आणि नंतर एक कोटीची खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी या व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन पार्कसाईट पोलिसांनी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.
४३ वर्षांचे तक्रारदार विक्रोळीतील पार्कसाईट परिसरात राहत असून त्यांचा रियल इस्टेटचा व्यवसाय आहे. त्यांचे मुंबई पोलीस दलातील अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांशी चांगले संबंध आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून ते काही अधिकार्यांच्या नियमित संपर्कात आहेत. १७ ऑक्टोंबर २०२४ रोजी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. सुरुवातीला त्याने तो दुबईहून दाऊद बोलत असल्याचे सांगितले. नंतर त्याने आपण छोटा शकील बोलत आहे असे सांगून त्यांच्याकडे तीन कोटीच्या खंडणीची मागणी केली होती. आजकल तु बहोत कमा रहा है. इसलिए पैसा देना पडेगा असे त्याने हिंदीतून त्यांना धमकी दिली होती. त्यांनी कोण दाऊद, कोण छोटा शकील असे विचारताच त्याने बिष्णोई पता है क्या असे सांगून त्याने पुन्हा त्याच्याकडे एक कोटीची खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार करु नकोस. मुझे पता है की पुलिस का खबरी असे सांगून फोन बंद केला.
हा प्रकार त्यांनी कोणालाही सांगितला नव्हता. मात्र दाऊद, छोटा शकील आणि बिष्णोईच्या नावाने आलेल्या तीन आणि एक कोटीच्या खंडणीसाठी आलेल्या या धमकीनंतर त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी पार्कसाईट पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.