मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ जुलै २०२४
मुंबई, – वेगवेगळ्या घटनेत सोळा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींचा त्यांच्याच परिचित तरुणांनी विनयभंग केल्याची घटना विक्रोळी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी दोन स्वतंत्र विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अटकेनंतर या दोघांनाही विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.
पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार महिला विक्रोळी परिसरात राहते. १८ जुलै ते २० जुलै या कालावधीत तिच्या सोळा वर्षांच्या मुलीला आरोपी तरुणाने रस्त्यात थांबवून तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. तिला स्वतकडे खेचून तिच्याशी अश्लील संभाषण केले होते. हा प्रकार मुलीकडून तिच्या तक्रारदार आईला समजताच तिने त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याने तिला शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच बघून घेण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर तिने पार्कसाईट पोलिसांत आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी ७४, ७५, ७९, ३५४ (२), ११५, भारतीय न्यास संहिता सहकलम ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली.
दुसर्या घटनेत २३ वर्षांच्या आरोपीस पार्कसाईट पोलिसांनी अटक केली. सोळा वर्षांची मुलगी तिच्या पालकांसोबत विक्रोळी परिसरात राहते. तिच्याच शेजारी आरोपी तरुण राहत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहे. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता ती तिच्या क्लासवरुन घरी जात होती. यावेळी त्याने तिचा हात पकडून माझ्यासोबत चल महत्त्वाचा काम आहे असे सांगून तिच्याशी अश्लील लगट करण्याचा प्रयत्न केला होता. घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी पार्कसाईट पोलिसांनी आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच शनिवारी आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली.