मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 जून 2025
मुंबई, – वडिलांच्या मित्राकडून एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार विक्रोळी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच 47 वर्षांच्या आरोपी मित्राला पार्कसाईट पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
14 वर्षांची बळीत मुलगी ही विक्रोळी परिसरात राहत असून ती सध्या याच परिसरातील एका खाजगी शाळेत आठवीत शिकते. याच परिसरात आरोपी राहत असून तो तिच्या वडिलांचा मित्र आहे. त्यामुळे ते एकमेकांच्या परिचित आहेत. अनेकदा तो त्यांच्या घरी येत होता. रविवारी दुपारी साडेतीन वाजता तो तिच्या घरी आला होता. ठसका लागल्याचा बहाणा करुन त्याने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करुन तिच्या छातीला नकोसा स्पर्श केला होता. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर टिव्हीवरील चॅनेल बदलत असताना त्याने पुन्हा तिच्या छातीला अश्लील स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता.
या प्रकाराने ती प्रचंड घाबरली. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असे सांगून तो तिच्या घरातून पळून गेला. काही वेळानंतर घडलेला प्रकार तिने तिच्या पालकांना सांगितला होता. त्यानंतर त्यांनी तिला पार्कसाईट पोलीस ठाण्यात आणले आणि तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला रात्री पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर त्याला सोमवारी विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीविरुद्ध पवई पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा एक गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.