37 वर्षांच्या विवाहीत महिलेची तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या
लग्नासाठी तगादा लावत असल्याने प्रियकराने संपविल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 एप्रिल 2025
मुंबई, – विक्रोळी येथे राहणार्या एका 37 वर्षांच्या विवाहीत महिलेची तिच्याच राहत्या घरी तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. सुमन सुरजलाल माताफेर असे या हत्या झालेल्या महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी तिचा 25 वर्षांचा प्रियकर हनासा शफीक शहा याला पार्कसाईट पोलिसांनी अटक केली आहे. सुमन आणि हनासा यांच्यात अनैतिक संबंध होते, लग्नासाठी तगादा लावत असल्याने त्याने तिची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. सकाळी उघडकीस आलेल्या या हत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
ही घटना सोमवारी रात्री नऊ ते मंगळवारी सकाळी साडेपाचच्या दरम्यान विक्रोळीतील मच्छिमार्केट, बाबा मटन शॉपजवळ घडली. याच परिसरात सुरजलाल हा त्याची पत्नी सुमनसोबत राहत होती. ते दोघेही मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी असून गेल्या काही वर्षांपासून विक्रोळी परिसरात राहत होते. सुरजलाल हा सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. त्याची पत्नी सुमन हिचा हनासा हा परिचित असून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. ते दोघेही एकाच ठिकाणी पूर्वी कामाला होती. तिथेच ओळख झाल्यानंतर त्यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले होते. तिला त्याच्यासोबत विवाह करायचा होता. त्यासाठी ती हनासावर प्रचंड दबाव आणत होती. त्यातून त्यांच्यात नेहमी खटके उडत होते.
मंगळवारी रात्री हनासा हा तिला भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता. यावेळी त्यांच्यात लग्नावरुन पुन्हा वाद झाला होता. या वादातून रागाच्या भरात त्याने सुमनवर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यात ती रक्तबंबाळ होऊन जखमी झाली होती. या घटनेनंतर तो तिच्या घरातून पळून गेला होता. दुसरीकडे सोमवारी रात्री नऊ वाजता सुरजलाल हा नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. सकाळी साडेपाच वाजता तो घरी आल्यानंतर त्याला सुमन रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आली. त्यामुळे त्याने ही माहिती विक्रोळी पोलिसांना दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या घटनेनंतर घटनास्थळी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनसह डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले होते. सुमनची तिच्या राहत्या घरी घुसून अज्ञात व्यक्तीने तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केली होती. त्यामुळे या हत्येची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपीचा शोध सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी हनासा शहा याला ताब्यात घेतले. तो मूळचा बिहारच्या औरंगाबादचा रहिवाशी असून सध्या बिहार येथे राहतो. चौकशीत त्याचे सुमनसोबत प्रेमसंबंध असल्याचे उघडकीस आले.
लग्नासाठी होणार्या वादातून त्याने तिची हत्या केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. त्याला बुधवारी विक्रोळीतील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. हत्येचा गुन्हा दाखल होताच कुठलाही पुरावा नसताना विक्रोळी पोलिसांनी काही तासांत पळून गेलेल्या आरोपीला अटक करुन या हत्येचा पर्दाफाश केला.