मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 जुलै 2025
मुंबई, – आर्थिक वादातून झालेल्या वादातून राहुल बळीराम आलदार या 34 वर्षांच्या व्यक्तीची त्याच्याच लहान भावाने बेदम मारहाण करुन हत्या केल्याचा प्रकार विक्रोळी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी वीस दिवसांनी पार्कसाईट पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन आरोपी भाऊ आकाश बळीराम आलदार (27) याला अटक केली आहे. हत्येच्या याच गुन्ह्यांत आकाश सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्याविरुद्ध हत्येचा पुरावा गोळा करण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना 6 जुलैला सकाळी साडेनऊ ते साडेबाराच्या सुमारास विक्रोळीतील पार्कसाईट, राहुलनगरच्या जय मातादी सोसायटीमध्ये घडली होती. याच सोसायटीमध्ये राहुल आणि आकाश हे दोघेही सख्खे बंधू राहतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आर्थिक वाद सुरु होता. 6 जुलैला याच कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यातून आकाशने राहुलला बेदम मारहाण केली. मारहाणीत बेशुद्ध झालेल्या राहुलला तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला होता. ही माहिती प्राप्त होताच पार्कसाईट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी आकाशने त्याचा मोठा भाऊ राहुल हा चक्कर आल्याने घरात पडल्याचे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला होता.
चौकशीत राहुलला दारु पिण्याचे व्यसन होते. 2021 साली त्याला हद्यविकाराचा झटका आला होता. त्याचे दारुचे व्यसन सुटावे म्हणून त्यांनी त्याला सोलापूरच्या बार्शी येथील व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते. तिथे औषधोपचार करुन तो बारा दिवसांत घरी आला होता. मात्र त्याचे दारुचे व्यसन सुटले नव्हते. गेल्या काही दिवासंपासून राहुल आणि आकाश यांच्यात पैशांवरुन प्रचंड वाद होता. याच वादातून त्यांच्यात भांडण झाले होते. त्यात राहुलला केलेल्या मारहाणीत तसेच त्याने त्याचा गळा आवल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला होता. शवविच्छेदन अहवालात ही बाब नमूद करण्यात आली होती.
स्थानिक रहिवाशांच्या चौकशीत आकाश आणि राहुल यांच्यातील वादाचा खुलासा झाला होता. राहुलने आपल्या जबानीत चुकीची माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्याच मारहाणीमुळे राहुलचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले होते. हा प्रकार उघडकीस येताच पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत नंदयाप्पा माळी यांच्या तक्रारीवरुन पार्कसाईट पोलिसांनी आकाश आलदार याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला शनिवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.