चोरीसाठी आला आणि जीव गमावून बसला

विक्रोळीत इमारतीवरुन पडून तरुणाचा मृत्यू

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ ऑगस्ट २०२४
मुंबई, – चोरीसाठी इमारतीत प्रवेश केलेल्या एका २२ वर्षांच्या तरुणाचा इमारतीवरुन पडून मृत्यू झाल्याची घटना विक्रोळी परिसरात उघडकीस आली आहे. अक्षय अरुण नाईक असे या २२ वर्षीय तरुणाचे नाव असून तो विक्रोळीचा रहिवाशी आहे. चोरीसाठी आला आणि जीव गमावून बसला. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

ही घटना रविवारी मध्यरात्री अडीच ते सकाळी सहाच्या सुमारास विक्रोळीतील कन्नमवारनगर एक, इमारत क्रमांक २३, मधुकुंज सहकारी सोसायटीमध्ये घडली. मधुकुंज ही २० मजल्याची इमारत असून सकाळी सहा वाजता इमारतीच्या सुरक्षारक्षकाला एक तरुण इमारतीच्या आवारात पडल्याचे दिसून आले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने विक्रोळी पोलिसांना ही माहिती दिली. ही माहिती प्राप्त होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी अवस्थेत पडलेल्या तरुणाला पोलिसांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तपासात मृत तरुणाचे नाव अक्षय नाईक असल्याचे उघडकीस आले. तो विक्रोळी येथील पार्कसाईट, स्मशानभूमीजवळील जनकल्याण सोसायटीत राहतात. अक्षय हा रविवारी रात्री उशिरा इमारतीमध्ये चोरीच्या उद्देशाने आला होता. यावेळी इमारतीवरुन पडून तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याला वेळीच औषधोपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. अक्षय हा नेमका कुठल्या मजल्यावरुन पडला याचा खुलासा होऊ शकला नाही. मात्र चोरीच्या उद्देशानेच तिथे आला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page