मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – दहशतीसाठी एका २७ वर्षांच्या तरुणावर त्याच्या परिचित आरोपीने चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना विक्रोळी परिसरात घडली. या हल्ल्यात प्रणित प्रकाश जाधव हा जखमी झाला असून त्याच्यावर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच रिझवान हमीद सय्यद ऊर्फ रिज्जू याला पार्कसाईट पोलिसांनी अटक केली. रिज्जू हा रेकार्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध तीनहून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रणित जाधव हा विक्रोळीतील पार्कसाईट परिसरात राहतो. बुधवारी रात्री तो त्याच्या मित्रांसोबत पार्कसाईट, अप्पर डेपो पाडा, विठ्ठल मंदिराजवळील मॉर्डन स्कूलसमोर गप्पा मारत होता. याच दरम्यान तिथे रिज्जू आला आणि त्याने त्यांच्याशी काहीही कारण नसताना वाद घालण्याचा प्रयत्न केला. या एरियाचा मी भाई आहे, मला ओळखत नाहीस का, तुझा मर्डर करुन संपूर्ण चेहरा खराब करुन टाकेन अशी शिवीगाळ करुन धमकी देऊ लागला. यावेळी त्याला त्यांनी समजविण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्याच्याकडील तिक्ष्ण हत्याराने प्रणितवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्याच्या चेहर्याला डोळ्याच्या वर गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे जखमी झालेल्या प्रणितला त्याच्या मित्रांनी जवळच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. ही माहिती मिळताच पार्कसाईट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी प्रणितच्या जबानीवरुन पोलिसांनी रिज्जूविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या रिझवान ऊर्फ रिज्जूला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्तया आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. रिज्जू हा याच परिसरातील यमुनानगर परिसरात राहत असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध पार्कसाईट पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध चॅप्टर केस असून त्याच्याकडून ५० हजार रुपयांचे बंधपत्र घेण्यात आले होते. परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी त्याने हा हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.