अश्लील व्हिडीओ दाखवून अल्पवयीन बहिणीवर लैगिंक अत्याचार
सोळा वर्षांच्या भावाची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ जानेवारी २०२४
मुंबई, – मोबाईलवरुन अश्लील व्हिडीओ दाखवून एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच सोळा वर्षांच्या भावाने लैगिंक अत्याचार केल्याची बहिण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना विक्रोळी परिसरात घडली. ही मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आरोपी भावाविरुद्ध विक्रोळी पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमातर्गत गुन्हा नोंदवून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याला पुढील कारवाईसाठी डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
पिडीत मुलगी ही विक्रोळी परिसरात राहत असून आरोपी तिचा भाऊ आहे. जून महिन्यांत घरात कोणीही नसताना त्याने तिला मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. त्यानंतर ती तिच्या आई-वडिल आणि भावासोबत उत्तरप्रदेशातील गावी गेली होती. नोव्हेंबर महिन्यांत त्याने गावी असताना तिच्यावर पुन्हा जवळीक साधून तिच्यावर जबदस्तीने अत्याचार केला होता. त्यातून ती गरोदर राहिली होती. विक्रोळीतील महात्मा फुले हॉस्पिटलमध्ये तिला मेडीकलसाठी आणण्यात आले होते. यावेळी ती गरोदर असल्याचे उघडकीस आले होते. याबाबत तिची एका समाजसेविकेने विचारपूस करुन चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार तिला सांगितला होता. त्यानंतर तिने विक्रोळी पोलिसांना ही माहिती सांगून तिच्या अल्पवयीन भावाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला याच गुन्ह्यांत चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला नंतर डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते.