मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – विलेपार्ले येथील कार अपघातात दोन मित्रांचा मृत्यू झाला. जलज आश्विनी धीर आणि सार्थक कौशिक अशी या दोघांची नावे असून ते दोघेही अठरा वर्षाचे होते. याप्रकरणी हलगर्जीपणाने कार चालवून दोघांच्या मृत्यूस तसेच स्वतसह दोघांना दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्यांचाच मित्र साहिल मेढाविरुद्ध विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भरवेगात कार चालवताना कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.
हा अपघात शनिवारी पहाटे साडेचार वाजता विलेपार्ले येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, सेंटॉर ब्रिजजवळील उत्तर वाहिनीवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जेडन जिम जॉर्ज हा सांताक्रुजच्या कालिना परिसरात राहत असून तो बीबीएच्या पहिल्या वर्षांत शिकतो. त्याचे सार्थक, जलज आणि साहिल हे तिघेही मित्र असून ते त्याच्यासोबत एकाच कॉलेजमध्ये तर सार्थक हा विलेपार्ले येथील कॉलेजमध्ये सायन्समध्ये शिकत होता. शुक्रवारी तो तिन्ही मित्रांसोबत त्यांच्या एका मित्राकडे गेले होते. तिथे त्यांना मद्यप्राशन करुन जेवण केले होते. रात्री साडेदहा वाजता जेडन हा जलज आणि सार्थकसोबत घरी जाण्यासाठी निघाला. यावेळी जेडन आणि साहिल रिक्षातून निघाले तर जलज आणि इतर दोेघेजण जलजच्या घरी गेले होते. तिथे काही वेळ गप्पा मारल्यानंतर त्यांनी मरिनड्राईव्ह जाण्याचा निर्णय घेतला होता. ते सर्वजण साहिलच्या सिटी कारमधून जाण्यास निघाले. ही कार जेडन हा चालवत होता. पहाटे चार वाजता वांद्रे येथे आल्यानंतर साहिलने कार चालविण्याचा निर्णय घेतला.
वेस्टर्न एक्सप्रेसने जाताना त्यांची कार विलेपार्ले येथील सहार स्टार हॉटेलजवळ आली होती. यावेळी गोरेगावच्या सर्व्हिस रोडच्या दिशेने जाताना साहिलचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याने हायवेच्या डिव्हायडरला जोरात धडक दिली होती. यावेळी कारचा स्पीड जास्त असल्याने ते सर्वजण जखमी झाले होते. काही वेळानंतर जेडन आणि साहिल कारमधून उतरले तर अपघातात जलज आणि सार्थक हे दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे या दोघांनाही जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर आणि वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरु असताना या दोघांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती समजताच विलेपार्ले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी जेडन जॉर्जची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या जबानीनंतर पोलिसांनी त्याचा साहिल मेढाविरुद्ध हलगर्जीपणाने कार चालवून दोन मित्रांच्या मृत्यूस तर स्वतसह जेडन याला दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांत अद्याप त्याच्यावर अटकेची कारवाई झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातात दोन्ही मित्रांच्या मृत्यूने त्याच्या पालकांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.