मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 मे 2025
मुंबई, – टेम्पोला धडक लागून झालेल्या अपघातात बाईकस्वारासह त्याच्या मित्राचा मृत्यू झाल्याची घटना विलेपार्ले परिसरात घडली. मृतांमध्ये तुषार दयानंद खंडागळे आणि चिराग नितीन नायर यांचा समावेश आहे. या अपघाताला जबाबदार अरविंदकुमार संतलाल यादव याच्याविरुद्ध विलेपार्ले पोलिसांनी हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी टेम्पोचालक पळून गेल्याने त्याचा शोध सुरु असल्याचे पोलीस उपनिरीक्षक शबाना मुलानी यांनी सांगितले.
हा अपघात गुरुवारी पहाटे साडेचार वाजता विलेपार्ले येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, रामनगर सबवेजवळ झाला. मंगेश बापू खंडागळे हे पोलीस दलातून निवृत्त झाले असून सध्या ते अंधेरीतील सहार रोड, नवीन पोलीस वसाहतीत राहतात. मृत तुषार हा त्यांचा मुलगा तर चिराग हा त्याचा मित्र आहे. गुरुवारी पहाटे साडेचार वाजता ते दोघेही त्यांच्या बाईकवरुन वांद्रे येथून विलेपार्ले येथील घराच्या दिशेने येत होते. यावेळी रामनगर सबवेजवळ अरविंदकुमार यादवने त्याचा टेम्पो कोणत्याही रिफलेक्टर, बॅरीकेट्स आणि इतर कोणत्याही सुरक्षा न बाळगता पार्क केला होता. त्यामुळे टेम्पोचा अंदाज न आल्याने त्यांच्या बाईकची टेम्पोला जोरात धडक लागली होती.
या अपघातात तुषार खंडागळे आणि चिराग नायर असे दोघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच विलेपार्ले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी दोघांनाही तातडीने जवळच्या कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले. या अपघाताची माहिती नंतर मंगेश खंडागळे यांना देण्यात आली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी टेम्पोचालक अरविंदकुमार यादवविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तो पळून गेला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.