स्कूटरची टेम्पोला धडक लागून 19 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू

अपघातात मित्र गंभीर जखमी तर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 जानेवारी 2026
मुंबई, – माहीम दर्गा येथून घराच्या दिशेने जाणार्‍या एका स्कूटरची टाटा टेम्पोला धडक लागून झालेल्या अपघातात फरहान शाहबुद्दीन शेख या 19 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र शाहिद खान हा गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्यावर सांताक्रुज येथील व्ही. एन देसाई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी टाटा टेम्पोचा चालक दिपक अशोक धोत्रे याच्याविरुद्ध विलेपार्ले पोलिसांनी हलगर्जीपणाने मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

हा अपघात बुधवारी सकाळी साडेपाच वाजता विलेपार्ले येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, मिलन सबवे बसस्टॉपजवळील नार्थ बॉण्डवर झाला. शाबुद्दीन फकीर मोहम्मद शेख हे व्यवसायान पेंटर असून गोरेगाव येथे राहतात. मृत फरहान हा त्यांचा 19 वर्षांचा मुलगा असून तो सध्या इलेक्ट्रीशियन आयटीआयचे शिक्षण घेत होता. शिक्षणासोबत तो ओशिवरा मेट्रो स्टेशन येथे कामाला होता. त्याच्या दैनदिन वापरासाठी शहाबुद्दीनने त्याला एक स्कूटर दिली होती. मंगळवारी रात्री पावणेदहा वाजता फरहान हा नेहमीप्रमाणे कामावर निघून गेला होता. काम संपल्यानंतर फरहान हा त्याच्या मित्रांसोबत माहीम दर्गा येथे दर्शनासाठी गेला होता. यावेळी त्याच्यासोबत स्कूटरवर त्याचा मित्र शाहिद खान तर इर्शाद सिद्धीकी आणि अल्मास शहा हे दुसर्‍या बाईकवर होते.

माहीम दर्गा येथून ते चौघेही पहाटे साडेपाच वाजता घराच्या दिशेने निघाले होते. फरहानची स्कूटर मिलन बसवे बसस्टॉपजवळ आली असताना पुढे जाणारा एक टाटा टेम्पो अचानक थांबला, त्यामुळे त्याला टेम्पोचा अंदाज न आल्याने त्याच्या स्कूटरची टेम्पोला जोरात धडक लागली होती. या अपघातात फरहान आणि शाहीद हे दोघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना तातडीने सांताक्रुज येथील व्ही. एन देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे फरहानला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले तर शाहिदवर उपचार सुरु करण्यात आले होते. अपघाताची माहिती मिळताच विलेपार्ले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

याप्रकरणी शाबुद्दीन शेख यांच्या जबानी नोंदवून पोलिसांनी टेम्पोचालक दिपक धोत्रे याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने टेम्पो चालवून एका तरुणाच्या मृत्यूस तर दुसर्‍याला गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दिपक हा कांदिवलीतील चारकोप गाव, काशिनाथ भंडारी चाळीचा रहिवाशी आहे. फरहानच्या अपघाती निधनाने गोरेगाव येथील शहीद भगतसिंग नगर, तिवारी चाळीतील रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page