सोन्याचे दागिने घेऊन बोगस लगड देऊन व्यापार्याची फसवणुक
१९ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी दोन्ही ठगाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१७ जानेवारी २०२५
मुंबई, – सोन्याचे दागिने घेऊन बोगस सोन्याची लगड देऊन एका ज्वेलर्स व्यापार्याची दोन ठगाने सुमारे १९ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार विलेपार्ले परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पळून गेलेल्या दोन्ही ठगाविरुद्ध विलेपार्ले पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अशोक आणि सुरेश अशी या दोघांची नावे असून या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
रमेशचंद्र जयनारायणजी भुद्रा हे ६९ वर्षाचें वयोवृद्ध तक्रारदार विलेपार्ले येथे राहतात. त्यांचा ओरो सायन्स नावाचे एक ज्वेलर्स दुकान विलेपार्ले येथील तेजपाल रोड, विरेश्वर कुंज अपार्टमेंटमध्ये आहे. ग्राहकांच्या ऑर्डरप्रमाणे सोन्याचे दागिने बनवून ते दागिन्यांचे विक्री करतात. अनेकदा त्यांना काही ग्राहक व्यापारी सोन्याचे दागिने दिल्यानंतर सोन्याची लगड देतात. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत त्यांच्या दुकानात अशोक आणि सुरेश नावाचे दोन व्यापारी आले होते. या दोघांनी त्यांच्याकडे काही सोन्याच्या दागिन्यांची ऑर्डर दिली. या दागिन्यांच्या मोबदल्यात त्यांना सोन्याची लगड देण्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी त्यांना होकार दिला होता.
५ जानेवारीला त्यांनी त्यांना फोन करुन दागिन्यांची बोरिवली येथे डिलीव्हरी करण्यास सांगितले होते. त्यामुळे त्यांचे दोन्ही कर्मचारी ९८ ग्रँम वजनाचे दोन सोन्याचे ब्रेसलेट, ८५ ग्रॅम वजनाचे सोन्याची चैन, ६२ ग्रॅम वजनाचे नेकलेस असे १९ लाख २० हजार रुपयांचे २४७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन बोरिवली येथे गेले होते. यावेळी या दोघांनी त्यांना सोन्याची लगड देऊन त्यांच्याकडून सोन्याचे दागिने घेतले होते. काही वेळानंतर ते दोघेही सोन्याचे दागिने घेऊन निघून गेले होते. सोन्याची लगड घेऊन दोन्ही कर्मचारी दुकानात आले आणि त्यांनी ती लगड रमेशचंद्र भुद्रा यांना दिली. त्याची तपासणी केल्यानंतर ती बोगस सोन्याची लगड असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्यांनी अशोक आणि सुरेश या दोघांनाही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांचे मोबाईल बंद येत होते.
या दोघांनी सोन्याचे दागिने घेऊन बोगस सोन्याची लगड देऊन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी दोन्ही आरोपीविरुद्ध विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अशोक आणि सुरेश या दोघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या दोन्ही आरोपींचा सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.