पूजेसाठी आलेल्या भामट्याने दहा लाखांचे दागिने पळविले
पळून गेलेल्या भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 डिसेंबर 2025
मुंबई, – घरात जादूटोणा केल्याची बतावणी करुन पूजेसाठी घरी आलेल्या एका भामट्याने महिलेच्या सुमारे दहा लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पलायन केल्याची घटना विलेपार्ले परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामचंद्र सुतार या भामट्याविरुद्ध विलेपार्ले पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
सुषमा अनिल कालेलकर ही महिला मूळची गुजरातची रहिवाशी असून गेल्या दोन वर्षांपासून ती तिच्या पती आणि मुलासोबत विलेपार्ले परिसरात भाड्याने राहते. ती सल्लागार म्हणून काम करते तर तिच्या पतीचा प्लास्टिक पाऊचचा व्यवसाय आहे. जून 2025 रोजी ती तिच्या मैत्रिणीसोबत आसामच्या कामख्या देवीच्या दर्शनासाठी गेली होती. मात्र तिथे प्रचंड गर्दी असल्याने तिने हॉटेलला जाण्याचा निर्णय घेतला. तिथेच तिची रामचंद्रशी ओळख झाली होती. त्याने तिला लवकर दर्शन हवे असल्यास दोन हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे तिने त्याला दोन हजार रुपये दिले होते. त्यानंतर तिला लवकर दर्शन मिळाले होते.
या भेटीदरम्यान त्याने तिच्या कुटुंबियांबाबत काही भविष्यवाणी केली होती. त्या गोष्टी तिला खर्या वाटल्या. त्याने त्यांच्यावर काही लोकांनी जादूटोणा केला आहे, पूजा करुन तिच्या आयुष्यातील सर्व संकट दूर करतो असे सांगितले. ऑगस्ट महिन्यांत तिने त्याला पूजेच्या वस्तूसाठी संपर्क साधला होता. यावेळी त्याने तो मुंबईत येणार असून तिथे आल्यानंतर तिच्या घरी पूजा करणार असल्याचे सांगितले. 22 ऑक्टोंबरला तो तिच्या घरी आला होता. तिच्या घरामध्ये नारळ घेऊन पूजा करुन त्याने तिच्याकडून अकराशे रुपये घेतले होते. चार दिवसांनी तो तिच्या घरी पुन्हा आला होता.
यावेळी त्याने तिच्या घरातील दागिने एका स्टिलच्या डब्ब्यात ठेवण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तिच्यासह तिच्या कुटुंबियांची स्थिती चांगली होईल. त्यामुळे तिने घरातील सर्व दागिने एका स्टिलच्या डब्ब्यात ठेवले होते. हा डब्बा उघडायचा नाही असे सांगून त्याने काहीतरी मंत्र जप केला. त्याने डब्बा उघडण्यास मनाई केली होती, त्यामुळे तिने डब्बा उघडला नाही. 6 डिसेंबरला तिला एका नातेवाईकांच्या लग्नासाठी जायचे होते. त्यासाठी तिला दागिन्यांची गरज होती. त्यामुळे तिने त्याला फोन करुन दागिन्याविषयी माहिती विचारली होती. यावेळी त्याने तिला तिच्या घरी येतो असे सांगितले, मात्र तो तिच्या घरी आला नाही.
हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने स्टिलचा डब्बा उघडला होता. त्यात सोन्याचे दागिने नव्हते. त्यामुळे तिने त्याला पुन्हा कॉल केला, मात्र त्याने तिला प्रतिसाद दिला नाही. या प्रकाराने तिला प्रचंड धक्का बसला होता. घरी कोणीतरी जादूटोणा केला आहे, पूजा करुन तिच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करतो असे सांगून रामचंद्रने तिच्याकडील सुमारे दहा लाखांचे सोन्याचे दागिने पळवून नेले होते. या प्रकारानंतर तिने विलेपार्ले पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रामचंद्र सुतारविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. रामचंद्रने अशाच प्रकारे जादूटोण्याच्या बहाण्याने इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जाते. त्याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.