एसआरए रुमसह गुंतवणुकीच्या बहाण्याने 54 लाखांची फसवणुक

बोगस लायसन्स सल्लागाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 जानेवारी 2026
मुंबई, – एसआरए रुमसह गुंतवणुकीच्या बहाण्याने एका कन्स्ट्रक्शन डेव्हलपर्स व्यावसायिकाची त्याच्याच परिचित आरोपीने सुमारे 54 लाखांची फसवुणक केल्याचा प्रकार विलेपार्ले परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सय्यद इजाज अहमद या एसआरएच्या बोगस लायसन्स सल्लागार आरोपीविरुद्ध विलेपार्ले पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून सय्यदने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

उस्मान रौनक खान हे अंधेरी येथे राहत असून त्यांचा कन्स्ट्रक्शन डेव्हलपेंटचा व्यवसाय आहे. 2017 रोजी त्यांच्या राहत्या चाळीचा एसआरए सर्व्हे झाला होता. याच दरम्यान त्यांची सय्यद अहमदशी ओळख झाली होती. या ओळखीत त्याने तो एसआरएचा लायसन्स सल्लागार असल्याचे सांगितले होते. त्याने त्यांचे मोठे रुम आहे, त्या रुमच्या बदल्यात त्यांना तिथे आठ रुम देण्याचे आमिष दाखविले होते. त्यासाठी त्यांना त्यांच्या चार रुमचे पार्टिशन करावे लागेल, नवीन मीटर घेऊन नवीन आयडी बनवून घ्यावे लागेल. प्रत्येक रुममागे पाच लाख असे वीस लाख रुपये खर्च येईल असे सांगितले. चार रुमच्या जागी आठ एसआरएचे रुम मिळत असल्याने त्यांनी त्यास होकार दर्शविला होता.

ठरल्याप्रमाणे त्यांनी त्याला टप्याटप्याने वीस लाख रुपये दिले होते. काही महिन्यानंतर त्याने त्यांना संबंधित एसआरए अधिकार्‍याची बदली झाली नसून त्याच्या जागी दुसरा अधिकारी आला होता, त्याला पाच लाख रुपये द्यावे लागतील, त्यानंतर त्याचे काम होईल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याला आणखीन पाच लाख रुपये दिले होते. मात्र एसआरएची पुढील कारवाई होत नसल्याने त्यांनी एसआरए कार्यालयात जाऊन चौकशी केली होती. यावेळी त्यांच्या चाळीचा एसआरए सर्व्हे रद्द झाला आहे. त्यांना त्यांच्या चार रुमऐवजी आठ रुम मिळणार नसल्याचे समजले होते.

या प्रकारानंतर त्यांनी सय्यदकडे विचारणा करुन त्याच्याकडे रुमसाठी दिलेल्या 25 लाखांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने त्यांना पैसे दिले नाही. 2019 रोजी सय्यद हा त्यांच्याकडे आला होता. त्याला त्याच्या व्यवसायासाठी पैशांची गरज असून त्यांनी त्याच्या व्यवसायात 29 लाखांची गुंतवणुक करावी. या गुंतवणुकीवर तो त्यांना चांगला परतावा तसेच त्यांचे आधीचे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्याने त्याच्या व्यवसायात 29 लाखांची गुंतवणुक केली होती.

मात्र या गुंतवणुकीनंतर त्याने त्यांना कुठलाही परतावा दिला नाही तसेच वारंवार पैशांची मागणी करुनही पैसे परत केले नाही. एसआरए रुमसह गुंतवणुकीच्या नावाने त्याने त्यांची 54 लाखांची फसवणुक केली होती. त्याच्याकडून पैसे मिळत नसल्याने त्यांनी घडलेला प्रकार विलेपार्ले पोलिसांना सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर सय्यद अहमद याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून याच गुन्ह्यांत त्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page