मथुराच्या हिंदू धर्म प्रचारकाला जिवे मारण्याची धमकी
धमकी देणार्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ डिसेंबर २०२४
मुंबई, – मथुराच्या एका ३८ वर्षांच्या हिंदू धर्म प्रचारकाला अज्ञात व्यक्तीने बॉम्बने जिवे मारण्याची धमकी दिली आहे. या धमकीनंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. ज्या मोबाईलवरुन ही धमकी देण्यात आली, त्या मोबाईल क्रमांकाचे कॉल डिटेल्ससह इतर माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. तक्रारदारांना मथुरा, दिल्ली येथे असताना अनेकदा धमकीचे कॉल आले असून त्यातील बहुतांश धमकीचे कॉल पाकिस्तानात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
आशितोष राजेंद्रकुमार पांडे हे उत्तरप्रदेशच्या मथुराचे रहिवाशी आहेत ते हिंदू धर्म प्रचारक म्हणून काम करत असून श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्त निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. या ट्रस्टच्या वतीने ते कोर्ट केसेस लढणे आणि हिंदू धर्म प्रचार करण्याचे काम करतात. मथुरा येथे श्रीकृष्ण जन्मभूमीची १३.५७ एकर जागा असून त्यातील २.५७ एकर जमिनीवर साई मशिद इदगाह ट्रस्टने अनधिकृतपणे कब्जा केला आहे. या जागेचा कोर्टाचा दावा सुरु असून यावर अंतिम सुनावणी अद्याप आलेली नाही. ऑक्टोंबर २०२३ पासून ते मुख्य पक्षकार म्हणून कोर्टात युक्तिवाद करत आहे. त्यामुळे त्यांना जानेवारी २०२४ पासून पाकिस्तानच्या वेगवेगळ्या व्हॉटअप क्रमांकावरुन जिवे मारण्याची धमकी येत आहे. या धमकीबाबत त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
२१ डिसेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत नाशिकच्या त्र्यबंकेश्वर येथील श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती जनजागरण अभियान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ते त्यांचे चुलते प्रदीपकुमार भार्गव यांच्यासोबत उत्तरप्रदेशातून दिल्लीमार्गे मुंबईत विमानाने येण्यासाठी निघाले होते. दिल्लीच्या इंदिरा गांधी एअरपोर्टवर असताना त्यांना पहाटे पाच वाजता एका अज्ञात क्रमांकावरुन व्हॉटअप कॉल आला होता. या व्यक्तीने त्यांना आम्हाला माहित आहे की तुम्ही मुंबईला जात आहे. तुमच्या यात्रेदरम्यान तुम्हाला बॉम्बने उडवून देऊ, त्यामुळे ही यात्रा बंद कर नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली होती. दिल्लीहून मुंबईतील विमानतळावर उतरताच ते विमानतळाजवळील जिंजर हॉटेलमध्ये वास्तव्यास होते.
यावेळी दुपारी अडीच वाजता त्यांना पुन्हा अज्ञात व्यक्तीने फोन करुन त्यांच्यासह हिंदू देवदेवतांना शिवीगाळ केली. त्यांच्या यात्रेदरम्यान तीन ते चार लोकांना ठार मारुन तुला बॉम्बने उडविणार आहोत. त्यासाठी तुला लवकरच डेमो दाखविले जाईल अशी धमकी दिली होती. हा कॉल सुरु असताना त्यांनी दुसर्या कॉलवरुन ऑडिओ रेकॉडिंग केले होते. त्यानंतर त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. या माहितीनंतर विलेपार्ले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी त्यांची जबानी नोंदवून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध शिवीगाळ करुन बॉम्बने जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या तक्रारीत नमूद मोबाईल क्रमांकाची माहिती घेण्यात आली या मोबाईलची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.