मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० जुलै २०२४
मुंबई, – अश्लील संभाषण करुन एका महिलेशी कॅबचालकानेच प्रवासादरम्यान लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार विलेपार्ले परिसरात घडला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन अज्ञात कॅबचालकाविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह मारहाण करुन धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कॅबच्या क्रमांकावरुन पळून गेलेल्या चालकाचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.
४१ वर्षांची तक्रारदार महिला कांदिवलीतील चारकोप परिसरात राहते. २६ जुलैला ती विलेपार्ले येथील ताज हॉटेलमध्ये कामानिमित्त गेली होती. काम संपल्यानंतर विलेपार्ले रेल्वे स्थानकात जाण्यासाठी ती रिक्षाची वाट पाहत होती. याच दरम्यान तिथे आरोपी त्याच्या व्हॅनगार कार घेऊन आला. त्याने तिला विलेपार्ले येथे सोडतो असे सांगून रिक्षाचे भाडे द्या असे सांगितले. त्यामुळे ती त्याच्या कारमध्ये बसली होती. ही कार वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, सेंट्रॉर ब्रिजखाली येताच कारचालकाने तिला तिचे नाव विचारले, मात्र तिने काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे त्याने तिला पुन्हा तिच्या नावाबाबत विचारणा केली. यावेळी तिने तुला काय करायचे आहे, तुझ्या कामाशी काम ठेव असे सांगितले. त्यानंतर त्याने तिच्याशी अश्लील संभाषण करण्यास सुरुवात केली. माझ्यासोबत चल, तुला खूप मजा येईल आणि मजा आली नाहीतर पैसे परत असे बोलून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तिने पोलिसांना बोलावू का असे बोलल्यानंतर त्याने तिची माफी मागितली. विलेपार्ले येथे आल्यानंतर तिने त्याला शंभर रुपये दिले. यावेळी त्याने तिच्याकडे अडीचशे रुपयांची मागणी केली. तिने पैसे देण्यास नकार देताच त्याने तिला अश्लील शिवीगाळ व मारहाण करण्याची धमकी दिली. त्यानंतर तो तेथून पळून गेला होता. यावेळी तिने व्हॅगनार कारचा क्रमांक नोंद करुन घेतला.
घडलेला प्रकार तिने तिच्या कुटुंबियांना सांगितला. त्यांनी तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ती विलेपार्ले पोलीस ठाण्यात आली आणि तिने घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगून कॅबचालकाविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात कॅबचालकाविरुद्ध पोलिसांनी ७९, ३५१ (२) भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपीच्या अटकेचे आदेश पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर कारच्या क्रमांकावरुन आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.